अयोध्या: अयोध्येमध्ये यावर्षी ५०० वर्षांनंतर दिवाळी साजरी होत आहे. हा एक ऐतिहासिक सोहळा असणार आहे. कारण, रामलल्ला यांच्या अभिषेकानंतर पहिल्यांदाच नवीन राम मंदिरात दिवाळी साजरी होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अयोध्या घाट आज (दि. ३०) २५ लाख दिव्यांनी सजवण्यात येणार असून, त्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलणार आहे. या घटनेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून अयोध्येत दीपोत्सवादरम्यान किती दिवे लावले जातात, याची नोंद केली जात आहे. यावेळी २५ लाख दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी स्थानिक कारागिरांना आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणताही दिवा खराब झाला तरी उद्दिष्ट गाठता येईल.
पर्यावरणपूरक फटाक्यांची होणार आतषबाजी
आज होणा-या दीपोत्सवामध्ये अयोध्येत पर्यावरणपूरक फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. हे फटाके १२० ते ६०० फूट उंचीवर आकाशात उडणार आहेत. तसेच परिसरातील ५ कि.मी.च्या अंतरावरून ते पाहता येणार आहेत. शरयू ब्रिजवर संध्याकाळी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.
१० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात
दिवाळीनिमित्त होणा-या कार्यक्रमाची सुरक्षा लक्षात घेता, अयोध्येत सुमारे १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राममंदिराकडे जाणारे सर्व रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले असून केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी या मार्गांवर पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. अयोध्या परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.