मुंबई : वृत्तसंस्था
शेअर बाजारात आज तेजीचे सत्र कायम आहे. आठवड्याच्या दुस-या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली. भारतातील सर्वात मोठी सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक वारी एनर्जीज आणि प्रीमियर एनर्जीजचे शेअर्स कामकाजादरम्यान ८ टक्क्यांपर्यंत वधारले. अमेरिकेनं आग्नेय आशियाई स्पर्धकांवर अँटी डम्पिंग ड्युटी लादल्याची घोषणा केल्यानंतर ही तेजी आली आहे.
अमेरिकेनं कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंडमधून होणा-या आयातीवर ३५२१ टक्क्यांपर्यंत नवं शुल्क लादलं आहे. अमेरिकेतील सौर ऊर्जा उत्पादकांनी याची मागणी केली होती. हे शुल्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या व्यापक शुल्काव्यतिरिक्त असेल.
वारी एनर्जीजचा शेअर ७.५६ टक्क्यांनी वधारून एनएसईवर २,६२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या आठ ट्रेडिंग सेशन्सपासून या शेअरमध्ये तेजी असून या कालावधीत स्टॉक २५ टक्क्यांनी वधारला. एनएसईवर प्रीमियर एनर्जीजचा शेअर ७.९८ टक्क्यांनी वधारून १,०९० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या आठ दिवसांपासून या शेअरमध्ये तेजी असून या कालावधीत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, चीनच्या हितसंबंधांच्या किंमतीवर अमेरिकेशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न करणा-या देशांना प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी चीननं सोमवारी दिली. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं शुल्क सवलतीच्या बदल्यात चीनबरोबरचे व्यापारी संबंध मर्यादित करण्यासाठी अमेरिका इतर देशांवर दबाव आणण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना हे वक्तव्य केलं.
सलग ६व्या दिवशी बाजार तेजीत
भारतीय शेअर बाजाराने आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजार घसरुनही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मंगळवारी शेअर बाजाराने छक्का लगावला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक आज नवीन उच्चांकावर बंद होण्यात यशस्वी झाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी दिसून आली.