छ. संभाजीनगर : राज्याच्या विविध भागांत जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे ५४ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे या कालावधीत एक हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या, असा दावा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
तसेच सरकारने बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे. नरिमन पॉईंट येथील ‘शिवालय’ या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शेतक-यांना एकूण १३ हजार ८१९ कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
अंबादास दानवे म्हणाले, अस्मानी आणि सरकारच्या सुलतानी संकटात कायम सापडलेल्या शेतक-यांवर मरणाला जवळ करण्याची वेळ आली आहे. गेल्या चारच महिन्यांत राज्यात एक हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे ५४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतक-यांना एकूण १३ हजार ८१९ कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उठवण्याचा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.