नवी दिल्ली : वृत्तसंस्था
४०० शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. या एनजीओचे दहशतवादी अफझल गुरुशी संबंध उघड झाले आहेत.
या मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणा-या एनजीओशी संबंधित असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. स्पेशल सीपी मधुप तिवारी म्हणाले, शाळांमध्ये अनेक दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे बनावट कॉल/मेल येत होते. गेल्या वर्षी १२ फेब्रुवारीपासून अशाप्रकारचे अनेक कॉल आणि मेल्सला सुरुवात झाली. हे मेल अतिशय प्रगत पद्धतीने पाठवले जात होते, त्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना वेळ लागला. अशातच, ८ जानेवारी २०२५ ला शेवटचा कॉल आला होता, त्यानंतर आता पोलिसांनी एका मुलाला ताब्यात घेतले आहे.
मधुप तिवारी पुढे म्हणाल्या की, दिल्लीतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणा-या या मुलाच्या कृत्यामागे कोणाचा हात आहे? याचा आम्ही तपास करत आहोत. मुलाचे वडील ज्या एनजीओशी संबंधित आहेत, त्या एनजीओने दहशतवादी अफझल गुरुला फाशीला देण्याच्या विरोधातही आवाज उठवला होता.