बोगोटा/नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दोन दिवसापूर्वी अमेरिकेच्या लष्कराच्या विमानाने १०४ भारतीयांना अमृतसर विमानतळावर सोडले, यावरुन संसदेतही गोंधळ झाला. आता आणखी एक अपडेट समोर आली आहे, अमेरिकेतून आणखी ४८७ भारतीयांना डिपोर्ट करण्यात येणार आहे. यावर आता परराष्ट्र खात्याने चिंता व्यक्त केली आहे.
तथापि, कोलंबियाने बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणा-या दोन अमेरिकन लष्करी विमानांना देशात उतरू दिले नाही. यामुळे अमेरिका संतप्त झाली होती. यानंतर कोलंबियाने स्वत: विमान पाठवून नागरिकांना परत आणले.
मात्र अमेरिकेने बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेल्या भारतीयांच्या हाता-पायात गुलामाप्रमाणे बेड्या घातल्या, आरोपींप्रमाणे लष्करी विमानात डांबून २१८ अवैध भारतीयांची पहिल्या टप्प्यात अमेरिकेतून भारतात रवानगी केली आणि हे भारत सरकारने सहन केले, मात्र कोलंबियाने आपल्या नागरिकांच्या बाबतीत ट्रम्पला भीक न घालता त्याचा दबाव धुडकावला.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोलंबियावर २५ टक्के व्यापार शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यासोबतच पुढच्या आठवड्यापासून ५० टक्के दर लावण्याची धमकीही दिली. ट्रम्पच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून, कोलंबियाने अमेरिकन सॅल्मनवर २५ टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये टॅरिफ वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, नंतर कोलंबियाने आपल्या निर्णयापासून माघार घेतली.
नोकरी सोडा, परत या : गुस्तावो पेट्रो
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेत राहणा-या अवैध स्थलांतरितांना देशात परतण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावर म्हटले की, अनधिकृत कोलंबियन लोकांना आवाहन करतो की तुम्ही अमेरिकेतील नोक-या त्वरित सोडा आणि शक्य तितक्या लवकर कोलंबियाला परत या आणि देशाची उभारणी करा. ते म्हणाले की, कोलंबिया सरकार कोलंबियाला परत येण्याची ऑफर स्वीकारणा-या सर्वांना व्यवसायासाठी कर्ज देईल. तथापि, कोलंबियाला परतणा-या लोकांना किती रक्कम मिळेल हे त्यांनी सांगितले नाही. प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेत सुमारे २ दशलक्ष अवैध कोलंबियन राहतात. कोलंबियाची लोकसंख्या ५ कोटींहून अधिक आहे. गुस्तावो पेट्रो हे कोलंबियाचे पहिले डावे राष्ट्राध्यक्ष आहेत. २०२२ मध्ये ते देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेत राहणा-या लोकांना त्यांनी देशात परतण्याचे आवाहन केल्याने अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये काहींनी पेट्रोचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली.