लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभेची निवडणुक पारदर्शक, निर्भय वातावरणात व्हावी, याकरीता संपूर्ण यंत्रणा दक्ष असून भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कार्यवाही करून ५० हजार रुपयेपेक्षा अधिक रोकड सोबत बाळगली जात असल्यास तातडीने जप्त करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अंबाजोगाई रोडवरील बोरवटी येथे स्थापन केलेल्या स्थिर निगराणी पथकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पथकाच्या कामाचा आढावा घेतला. अवैध पद्धतीने होणारी मद्य, रोकड आदी वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर निगराणी पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कार्यवाही करून ५० हजार रुपयेपेक्षा अधिक रोकड सोबत बाळगली जात असल्यास तातडीने जप्त करावी, अशा सूचना सागर यांनी यावेळी दिल्या. तसेच पथकामार्फत केल्या जाणा-या कार्यवाहीची पाहणी केली. सहायक नोडल अधिकारी जावेद शेख यावेळी उपस्थित होते.
दरम्यान भारत निवडणूक आयोगाने लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त्त केलेले निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार आणि निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृतीसाठी आयोजित कार्यक्रमाला दोन्ही निवडणूक निरीक्षकांनी उपस्थिती लावली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार आणि संजीब बॅनर्जी यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक पूर्वतयारी व इतर अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. तसेच सी-व्हीजील कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्ष, एक खिडकी कक्ष, मतदान साहित्य वाटप कक्ष, माहिती व तंत्रज्ञान कक्ष आदी कक्षांना भेटी देवून संबंधित नोडल अधिकारी यांचेकडून तेथील कामकाजाचा आढावा घेतला.