लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दि. ४ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत होणार असून लातूरच्या नाट्य रसिकांना १३ दर्जेदार नाटकांची मेजवनी लाभणार आहे.
या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दि. ४ डिसेंबर रोजी युवा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था तांदुळजा यांच्या वतीने महेंद्र खिल्लारे लिखीत व प्रवीण जोगदंड दिग्दर्शित गुलाल, दि. ५ डिसेंबर रोजी उन्नती फाऊंडेशन लातूरद्वारा विशाल बादल लिखीत व गिरीश बिडवे दिग्दर्शित आज महाराष्ट्र दीन आहे, दि. ६ डिसेंबर रोजी सूर्योदय बहुउद्देशिय सेवाभावी संस्था लातूरच्या वतीने अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखीत व दिग्दर्शित स्मशानयोगी, दि. ७ डिसेंबर रोजी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान लातूरद्वारा हिमांशू स्मार्त लिखीत व संजय अयाचित दिग्दर्शित परफेक्ट मिसमॅच, दि. ८ डिसेंबर रोजी स्पर्श बहुउद्दशिय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने डॉ. मोनिका ठक्कर लिखीत व राजकिरण कुणकीकर दिग्दर्शित कायनी दोस्त, दि. ९ डिसेंबर रोजी सम्यक बहुउद्देशिय सेवाभावी ज्ञानप्रसारक मंडळ लातूरच्या वतीने पांडरंग वाघमारे लिखीत व दिग्दर्शित तु यावं.
दि. १० डिसेंबर रोजी सह्याद्री प्रतिष्ठान लातूरच्या वतीने श्रीराम गोजमगुुंडे लिखीत व अविष्कार गोजमगुंडे दिग्दर्शित पुन्हा पुन्हा मोहोंजोदाडो, दि. ११ डिसेंबर रोजी नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूरद्वारा जयवंत दळवी लिखीत व डॉ. चंद्रकांत शितोळे दिग्दर्शित सभ्य गृहस्थ हो, दि. १२ डिसेंबर रोजी कलोपासक मंडळ लातूरच्या वतीने विजय तेंडूलकर लिखीत व श्रुतिकांत ठाकुर दिग्दर्शित मी कुमार, दि. १३ डिसेंब रोजी कलारंग लातूरच्या वतीने मधुकर तोरडमल लिखीत व कल्याण वाघमारे दिग्दर्शित भोवरा, दि. १४ डिसेंबर रोजी ग्राम स्वराज लातूरच्या वतीने अनिल दांडेकर लिखीत व अपर्णा गोवंडे दिग्दर्शित खेळ, दि. १६ डिसेंबर रोजी धर्मवीर राजे प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने एम. जी. राठोड लिखीत व दिग्दर्शित गावगुंंड शेवटी झाला थंड तर १७ डिसेंबर रोजी अभयरत्न सामाजिक विकास संस्था लातूरच्या वतीने नागेंद्र माणेकरी लिखीत व प्रदीप भोकरे दिग्दर्शित चाफा सुगंधी या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
यावर्षीपासून लातूर हे स्वतंत्र केंद्र झाले आहे. लातूर जिल्ह्यातील १३ संघांनी सहभाग घेतला आहे. जुन्या आणि नव्या कलावंतांचा हा सांस्कृतिक मेळावा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. लातूरच्या नाट्यरसिकांसाठी ही अपूर्व सांस्कृतिक मेजवानी आहे. यांतील अर्ध्याहून अधिक नाटके नव्या पिढीने लिहिलेली आणि सादरीकरणातही नवा आविष्कार, विनोदी, ग्रामीण ढंगाचे, कौटूंबिक, वैचारिक, समाजाच्या नवीन प्रश्नांवर भाष्य करणारी अशा विविध प्रकारच्या नाटकाचा ऐवज या स्पर्धेत आढळणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी ही माहिती दिल. नाट्य रसिकांनी या नाट्य मेजवानीचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाट्य स्पर्धेचे समन्वयक ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी केले आहे.