लातूर : प्रतिनिधी
मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटूंबांचे सर्वेक्षणा बरोबरच एसस्सी, एसटी, ओबीसी समाजाचेही सर्वेक्षण सुरु झाले. शाळा सुरू ठेवून शिक्षक आदलून बदलून सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. सदर सर्व्हेक्षणाच्या कामात शाळेतील ९० टक्के शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक ज्ञानदानाच्या बरोबरच मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटूंबांचे सर्वेक्षण करताना त्यांची तारेवरची कसरत होताना दिसून येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासकीय पातळीवर गतीमान निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणचे लातूर जिल्हयातील १ हजार २७५ जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांवर मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटूंबांचे व इतर कुटूंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. शिक्षकांना शाळा सुरू ठेवून मराठा व खुल्या प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील कुटूंबांचे सर्वेक्षण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक शाळा सांभाळत असून एक शिक्षक कुटूंबांचे सर्वेक्षण करत आहे. सदर शाळेतील शिक्षक हे आलटून-पालटून काम करताना दिसून येत आहेत.
शाळा सुरू ठेवून शिक्षकांचे सर्वेक्षण
लातूर तालुक्यातील १६४ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळा सुरू ठेवून सर्वेक्षणाचे काम करत आहेत. दररोज या सर्वेक्षणाच्या कामावर ९० टक्के उपस्थित राहत आहेत. तर उर्वरीत शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत. शिक्षकांना शाळा सुरू ठेवून आपल्या गावात सर्वेसाठी आलटून पालटून जाण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी दिली.
शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करून शाळा सुरूच
लातूर जिल्हयातील शिक्षकांना कुटूंबांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार कांही शिक्षक शाळेवर थांबून आध्यापन करत आहेत. तर कांही शिक्षक मराठा व खुल्या प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील कुटूंबांचे सर्वेक्षण करत आहेत. पर्यायी व्यवस्था करून शिक्षक शाळा सुरू ठेवण्याच्या बरोबरच सर्वेक्षणाचेही काम करत आहेत. प्रसंगी एक शिक्षक शाळा असेल तर शेजारच्या शाळेतील शिक्षकांना बोलून परस्पराच्या सहकार्यातून सध्या काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदाना फूटाणे यांनी दिली.