HomeUncategorizedअवकाळीचा धडाका सुरूच

अवकाळीचा धडाका सुरूच

मराठवाड्यासह राज्यात गारपिटीसह पाऊस, पिकांची हानी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
गुरुवारी सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील धाराशिव, जालना, नांदेड, बीड आणि विदर्भात वाशिम, अकोला, बुलडाणा, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.

सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रबी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, सणाच्या दिवशीच बळीराजावर चिंतेचे मोठे संकट ओढवले. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याला गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. इंदापूर, खानापूर, तेरखेडा, वाशी, बोरी आणि गोलेगाव परिसरात वादळी वा-यासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये उभी ज्वारी, गहू, हरभरा आणि काढणीस आलेला कांदा भूईसपाट झाला. याशिवाय आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, कलिंगड आणि पालेभाज्याही गारांच्या मा-याने उद्ध्वस्त झाल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, बदनापूर आणि जालना शहरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. यामुळे गहू, हरभरा, मका यासह मोसंबी आणि केळीच्या बागांना मोठा फटका बसला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यासह इतरही काही भांगात वादळी वा-यासह गारपीट झाली.

यासोबतच विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला असला, तरी शेतक-यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यासोबतच अकोला, बुलडाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने धडाका दिला. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीच्या खानापूर घाटमाथ्यावर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. भिवघाट, हिवरे आणि पळशी परिसरात भीषण गारपीट झाली. पळशीत छाटणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष मण्यांचे मोठे नुकसान झाले. सातारा, कोल्हापुरातही अवकाळीने हजेरी लावली. निसर्गाच्या या अवकृपेमुळे सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. ह्लदिवस-रात्र कष्ट करून पिकवलेली पिके डोळ््यादेखत मातीमोल होताना पाहून आता जगायचे कसे, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR