नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, छ. संभाजीनगरला तडाखा
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगरसह मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, छ. संभाजीनगर, जालन्यातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे रबी पिकांसह फळझाडे, भाजीपाल्यांची प्रचंड हानी झाली असून, ठिकठिकाणी वीज पडून जानावरेही दगावली. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात १२ मंडळांत तर छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गंगापूर तालुक्यात एकाच दिवसात ८२ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नदी-नाल्यांना पूर आला. वीज पडून १ ठार तर वीज पडून आणि पुरात शेळ््या, मेंढ्यासह मोठ्या प्रमाणात जनावरेही दगावली. तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले.
विजांच्या कडकडाटासह रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होता. विभागात सोमवारी सकाळपर्यंत जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. वादळात कापूस, मका, हरभरा आणि ज्वारी पिके आडवी पडली. विभागात १०७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून हिंगोलीत वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील चिमेगाव (ता. औंढा नागनाथ) राजू शंकरराव जायभाये यांचा वीज पडून मृत्यू झाला तर विष्णू सखाराम नागरे हा जखमी झाला. यासोबतच वीज पडून ३२ जनावरे दगावली असून, यात २३ लहान, ९ मोठ्या जनावरांचा समावेश आहे. तसेच शेळ््या-मेंढ्याही मोठ्या प्रमाणात दगावल्या. एकट्या परभणी जिल्ह्यातच ३५ च्या जवळपास पशुधन दगावले.
नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरात सखल भागात पाणीच पाणी झाले, तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्याने खरिपाच्या तुरी, कापसासह रबी पिके, फळझाडांचे अतोनात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात नांदेड शहर, लिंबगाव, तरोडा, नाळेश्वर अर्धापूर, तासमा, शेवडी, पिंपरखेड, कलंबर, सोनखेड, उस्माननगर आदी मंडळांचा समावेश आहे. दरम्यान, किनवट तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या पावसादरम्यान वीज पडून एक म्हैस दगावली. मात्र, पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
हिंगोलीसह परभणी जिल्ह्यातही परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह रविवारी मध्यरात्री पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला असून, शेत शिवार जलमय झाला आहे. मात्र, या तडाख्यात पिकांची हानी झाली. जिंतूर तालुक्यात शेळ््या, मेंढ्या वाहून गेल्या, तर वीज पडून शेळ््या, मेंढ्यासह जनावरेही दगावली. हिंगोली जिल्ह्यातही ब-याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेच जालन्यातही काही भागांत पाऊस झाला.
दरम्यान, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात अवकाळीने तडाखा दिला. यात गंगापूर महसूल मंडळात सर्वाधिक ७३ मि. मी. पावसाची नोंद झाली. गंगापूर शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून अनेक गाळ््यांत पाणी साचले होते. तसेच उसतोड कामगारांच्या झोपड्यांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले. तसेच रबी पिकांची हानी झाली. यात सर्वात मोठा फटका कांदा पिकाला बसला असून, कांद्याचे रोपेच उन्मळून पडली आहेत.
परभणीत वीज पडून शेळ््या,
मेंढ्यासह जनावरे दगावली
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या करपरा नदीच्या पुरात १५ शेळ््या-मेंढ्या आणि एक गाय-वासरू वाहून गेले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. या पुराच्या तडाख्यात मेंढपाळाची मोठी हानी झाली. यामध्ये ७ शेळ््यांसह ८ पिल्यांचा समावेश आहे. यासोबतच बोरी, निवळी बु. जांब बु. येथील शेतक-यांच्या २० शेळ््या, १० मेंढ्या, २ बैल, ७ वासरे यांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
गुजरातमध्ये वीज
पडून २० ठार
महाराष्ट्रासोबत गुजरातलाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी सकाळपासून चालू झालेल्या या पावसामुळे अनेक शहरे आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात आतापर्यंत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या याहून अधिक असू शकते. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. तसेच ४० हून अधिक जनावरे दगावली आहेत.