निमित्त दीपावलीचे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पारंपरिक अलंकारांनी मनोहारी साज
पंढरपूर /प्रतिनिधी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली महोत्सव धार्मिक उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. वसुबारसपासून दीपावली महोत्सवास प्रारंभ झाला असून, या मंगलपर्वानिमित्त श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी माता तसेच परिवार देवतांना परंपरेनुसार विविध आकर्षक व मौल्यवान पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व तेजस्वी दिसत असून, दर्शनासाठी येणा-या भाविकांना या अलंकारांचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकूट, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हि-याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मत्स्य जोड, मोठा शिरपेच, लहान शिरपेच, तुळशीची माळ, एकदाणी, तोडे जोड, मोहरांची माळ, जवेची माळ इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकूट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमनी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ््यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
मंदिरातील परिवार देवतांनाही दीपावलीनिमित्त पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले. राधिका मातेस नक्षीदार टोप, मोत्याचा कंठा, नेकलेस व पुतळ्यांची माळ तर सत्यभामा मातेस सिद्धेश्वर टॉप, मोत्याचा कंठा, ठुशी व पुतळ््यांची माळ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले. त्याचप्रमाणे श्री व्यंकटेशास झनक-झनक हार, कोयरी हार, तुळशीचा हार, शाळीग्राम हार, मोहनमाळ व सूर्यकळीचा हार व महालक्ष्मी मातेस सोन्याचे कंगन, मोत्याची कंठी लक्ष्मीपदक लॉकेट इमिटेशन नेकलेस पुतळ््याची माळ, अष्टपैलू मण्याची कंठी, चांदीची छत्री असे विविध पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा या सणांच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच भक्तनिवास या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला असून, भाविकांसाठी हे आकर्षण ठरत आहे.
पंढरीत भाविकांची गर्दी
दीपावलीच्या मंगलपर्वात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे पारंपरिक पोशाख व अलंकारांचे मनोहारी रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सुलभ व सुव्यवस्थित दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. श्रीकांत यादव यांनी सांगितले.
















