लातूर : एजाज शेख
सरकारने दुष्काळात शेतक-यांना मदत म्हणून ५ हजार रुपये अग्रिम देताना फॉर्मर आयडीची अट घातल्याने जिल्ह्यातील ५७ हजार ८५५ शेतक-यांसमोर फॉर्मर आयडीची अडचण उभी राहिली आहे. असो, पण ज्या शेतक-यांनी सरकारच्या अटी, शर्थी पुर्ण केल्या त्यांनाही ५ हजार रुपये अद्याप मिळालेले नाही. दिवाळीपुर्वी ९५ टक्के शेतक-यांच्या बँक खात्यावर ५ हजार रुपये पडतील, असे आश्वासन सरकारने दिले होते. दिवाळी सुरु झाली. दोन दिवस संपले, हे आश्वासन कधी पूर्ण होणार? की, दिवाळी निघून जाणार?, असा प्रश्न सामान्य शेतक-यांना पडला आहे.
लातूर जिल्ह्यात ५ लाख ८ हजार ८६० शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ५० हजार ९०५ शेतक-यांनी फार्मर आडी काढले आहेत. तर ५७ हजार ८५५ शेतक-यांकडे फॉर्मर आयडीच नाही. पीकविमा भरण्यासाठी फॉर्मर आयडीची अट होती. परंतु, पीकविमाच मिळत नसल्याने लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांनी यंदा पीकविमाच भरला नाही. अशा जिल्ह्यातील ५७ हजार ८५५ शेतक-यांसमोर फॉर्मर आयडीची अडचण उभी राहिली आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील २ लाख ५१ हजार ७४७ शेतक-यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ९३.९७ टक्के शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
दिवाळीपूर्वी पात्र शेतक-यांच्या खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित मदत दिली जाणार आहे. परंतु, हे सर्व कागदावरच दिसून येत आहे. प्रत्यक्षात या कामाला गती मिळत नाही. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे ही सर्व कामे अर्धवट राहिली आहेत. परिणामी शेतकरी, शेतमजूरांच्या घरीची दिवाळी अंधारातच आहे.
















