21.1 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसंपादकीयआक्रमक आघाडी !

आक्रमक आघाडी !

ईव्हीएम, निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील महायुती सरकारच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गाजला. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आमदारांनी शनिवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणे टाळले. हंगामी अध्यक्षांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव पुकारताच सर्वजण सभागृहाबाहेर पडले. मतदानयंत्राद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी १५ व्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदस्यांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. आपल्याला विधानसभा निवडणूक निकाल अमान्य आहे.

तसेच ईव्हीएममध्ये गडबड आहे, असे म्हणत आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांतील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. मात्र आघाडीतील समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पुण्यातील वडगाव-शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे आघाडीत कोणताही समन्वय नसल्याचे दिसून आले. ‘लोकशाही झिंदाबाद’, ‘आय लव्ह मारकडवाडी’ असे पोस्टर झळकावत आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तरी कुठे जल्लोष नाही, मिरवणूक नाही. त्यामुळे महायुतीला जनतेने कौल दिला नसून हा ईव्हीएम व निवडणूक आयोगाचा महायुती विजयी होण्याचा आयोजित कार्यक्रम आहे.

आम्ही देखील विजयी आमदार आहोत. त्यामुळे जनतेचा मान ठेवत शनिवारी शपथ न घेता शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकत आहोत. महायुतीला एवढे मोठे बहुमत मिळाले कसे याबाबत मारकडवाडीच्या लोकांच्या मनातही संशय आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला पण निवडणूक आयोग व पोलिसांनी त्याला मज्जाव केला. आघाडी मारकडवाडीतील ग्रामस्थांसोबत आहे. २०१४ पासून लोकशाही चिरडण्याचे काम सुरू आहे. या सर्वांचा निषेध म्हणून आमदारकीची शपथ घेत नाही. यापुढे लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लाँग मार्च काढणार आहोत असा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. मारकडवाडीतील काही ग्रामस्थांना अटक करण्यात आली आहे. आम्ही जिंकलो असलो तरी आज शपथ घेणार नाही. निवडणूक निकालावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. मारकडवाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

यात निवडणूक आयोगाचा काय संबंध? पोलिसांचा काय संबंध? गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकशाही पद्धतीने आलेले महायुती सरकार त्यावर वरवंटा फिरवण्याचे काम करत आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. महायुती सरकार जनमताने आलेले नाही असे राज्यातील जनतेचे मत आहे. हे सरकार मते चोरून आले आहे. मारकडवाडीतील मॉक पोलिंग होऊ द्यायला हवे होते. मारकडवाडीतील लोकांचे मत, जनभावना समजून घ्यायला हवी होती असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नवनिर्वाचित आमदारांना शपथ घेण्यासाठी रविवार शेवटचा दिवस आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत रविवार संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावी लागेल. अन्यथा त्यांना सोमवारपासून सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला.

आपण काही तरी वेगळे करतोय हे दाखवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असेही ते म्हणाले. आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्या जनतेचा हा अपमान आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ईव्हीएमविरुद्ध पुराव्यांशिवाय बोलणे अयोग्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला ७२ लाख मते मिळाली पण फक्त १० आमदार निवडून आले. या उलट अजित पवार गटाला ५८ लाख मते मिळाली पण त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. ८० लाख मते मिळालेल्या काँग्रेसचे १५ तर ७९ लाख मते मिळालेल्या शिवसेना शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले हे गणित न समजण्यासारखे म्हणजेच कोड्यात टाकणारे आहे.

जोपर्यंत ईव्हीएमविरुद्ध आपल्याकडे आधार नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत असे शरद पवार म्हणाले. सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळल्याने आता कायदेशीर अभ्यास करून कोर्टात जाणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादीच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी एक्झिट पोलमध्ये आघाडी आणि महायुती यापैकी कुणालाही १४५ वर जागा मिळणार नाहीत असे सांगितले जात होते मात्र, प्रत्यक्षात निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला एकहाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान मिळाला. तसेच महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपला १३२ जागा मिळाल्या. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. गत काही महिन्यांत ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या.

छोट्या राज्यात अन्य पक्ष पण मोठ्या राज्यात विरोधी वातावरण असतानाही भाजप निवडून आला, हे कसे? असा प्रश्न सा-यांनाच पडला आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडीला अपयश आल्यानंतर समाजवादी पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीत कोणतीही फूट पडलेली नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुका एकत्रपणेच लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही एकत्रपणे येणा-या सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. पराभव झाल्यामुळे नाराज व्हायचे कारण नाही असे ते म्हणाले. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या कारभाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारीही दाखवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विरोधकांची एकजूट राहील असे दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR