25.9 C
Latur
Wednesday, June 25, 2025
Homeराष्ट्रीयआता घरबसल्या आधार अपडेट करता येणार!

आता घरबसल्या आधार अपडेट करता येणार!

नवी दिल्ली : प्रतिनिधी
आधार कार्डधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तुम्हाला घरबसल्या मोबाइल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख आणि नाव बदलण्याची कामे पूर्ण करता येणार आहेत. नोव्हेंबर २०२५ पासून आधार कार्डमधील माहिती तुम्ही अपडेट करू शकता. बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅनसाठी आधार केंद्रावर जावे लागेल. तशी सुविधा उपलब्ध करून दिल्यास आधार अपडेट करण्यासाठी दुरुस्ती केंद्रांवर रांगा लावणा-या नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ओटीपीच्या माध्यमातून ही दुरुस्ती शक्य होणार आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच एक नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. ज्यानुसार तुमचा डेटा दुस-या सरकारी डेटाबेसमधून ऑटोमेटिक घेतला जाईल. पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा, जन्म प्रमाणपत्र आणि दहावीचे गुण यासारख्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होऊ शकते. ऑनलाईन अपडेटद्वारे आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईलनंबर सारखी माहिती अपडेट होईल, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागणार नाहीत. रिपोर्टनुसार यूआयडीएआय वीज बिलाची माहितीदेखील लिंक करण्याची तयारी करत आहे.

सद्यस्थितीत आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर आधार केंद्रावर जावे लागते. तेथे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबरमध्ये बदल होतो. म्हणजेच प्रत्येक अपडेटसाठी आधार केंद्रावर जावे लागते. मात्र, २५ नोव्हेंबरनंतर ही प्रक्रिया पूर्णत: डिजिटल असेल. युजर्सला केवळ एका ओटीपीची आवश्यकता असेल. त्याआधारे घरबसल्या आपले आधार अपडेट करू शकता. जे लोक आधार केंद्रावर पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

यूआयडीएआयकडून लवकरच नवे मोबाईल अ‍ॅप लाँच केले जाणार आहे. त्यामध्ये क्यूआर कोड बेस्ड इलेक्ट्रॉनिक आधार उपलब्ध होईल. त्यामुळे आधार कार्डची फोटो कॉपी किंवा प्रत द्यावी लागणार नाही. डिजिटल मास्क्ड आधार कार्ड तुम्ही शेअर करू शकता. यामुळे खोटे आधार कार्ड तयार करणा-यांवर नियंत्रण येईल. सध्या घरबसल्या आधार कार्डमध्ये पत्ता ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येतो. मात्र, त्यासाठी आधार क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असते. जर आधार कार्डसोबत मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर माय आधार पोर्टलवर या सुविधेचा वापर करू शकणार नाही. सध्या तुम्हाला जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर यामध्ये बदल करायचे असल्यास आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल. यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.
गैरसोय टाळण्यासाठी
नवी सुविधा देणार?
अनेक आधार कार्डधारकांसाठी आधारमधील माहिती अपडेट करणे त्रासदायक होत आहे. आधार अपडेटसाठी अपॉईंटमेंट घ्या, रजा काढा, अर्ज भरा, कागदपत्रे जोडा यामुळे त्रासांपासून सुटका व्हावी, म्हणून यूआयडीएआयकडून नवी सुविधा उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR