तेहरान : वृत्तसंस्था
पाकिस्तान जरी इराण सोबत असल्याचे सांगत असला तरी इराणच्या सूत्रांनुसार पाकिस्तानने इराणच्या पाठीत वार केला आहे. इस्त्रायलने १३ जूनला इराणचे टॉप कमांडर मोहम्मद हुसैन बकरी यांची हत्या केली होती. या प्रकरणी पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीर यांचे नाव समोर आले आहे. इराणच्या टॉप कमांडरचे लोकेशन अमेरिका आणि इस्त्रायलसोबत शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इराणच्या सूत्रांच्या दाव्यानुसार पाकिस्तान इराण आणि इस्त्रायल संघर्षात डबल गेम खेळत आहे. इराण आणि पश्चिमेकडील देशांसोबत संबंध कायम ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार मोहम्मद हुसैन बकरी यांच्या हत्येपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस पाकचे सेनाप्रमुख असीम मुनीर यांनी त्यांची भेट घेतली होती, आणि एक स्मार्टवॉच भेट दिलं होतं.
इराणच्या मीडियाच्या दाव्यानुसार त्या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस ट्रॅकर होता, ज्यामुळे इस्त्रायलच्या सैन्याला मोहम्मद हुसैन बकरी यांचे लोकेशन मिळालं होतं. ज्यामुळं त्यांच्यावर हल्ला करण्यात इस्त्रायलला यश आलं. १३ जूनच्या हल्ल्यात मोहम्मद हुसैन बकरी आणि त्यांचे दोन सहकारी मारले गेले होते. सूत्रांच्या दाव्यानुसार मोहम्मद हुसैन बकरी यांची भेट घेतल्यानंतर असीम मुनीर यांनी गुप्तपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.
गेल्या १० दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत इराणमध्ये ४०० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५०० लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सैन्याचे टॉप कमांडर आणि अणू शास्त्रज्ञांचा देखील त्यात समावेश आहे.