विविध क्षेत्रातील ८९ गौरवमूर्तींचा होणार कृतज्ञता सन्मान
लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्याच्या मातीतील जनसामान्यांचा आवाज म्हणून गेली ३५ वर्षे जनसेवेत असलेल्या पुरोगामी विचाराच्या एकमतचा आज वर्धापनदिन. या वर्धापनदिन सोहळ््यानिमित्त गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लातूर येथील मार्केट यार्डमधील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या जिल्ह्यातील ८९ सन्मानार्थींचा कृतज्ञता सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ््याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकमत परिवाराच्या वतीने संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी केले आहे.
एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एकमतच्या मार्गदर्शक आणि विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख या राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक योगिराज माने, उच्चतम बाजार समिती लातूरचे सभापती जगदीश बावणे, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, डॉ. सारिका देशमुख, संगीता मोळवणे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर सुडे यांच्यासह एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर उपस्थित राहणार आहेत.
एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी वैद्यकीय, व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक, बांधकाम, उद्योग, प्रशासन, सांस्कृतिक, ग्रामविकास, कला, क्रीडा, साहित्य, महिला सक्षमीकरण, कृषी, सहकार आदी क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या जिल्ह्यातील मान्यवरांना कृतज्ञता सन्मानाने गौरविण्यात येते. यंदाही जिल्ह्यातील ८९ सन्मानार्थींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. एकमतच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळ््याला एकमतवर प्रेम करणा-या वाचक, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकमत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
















