जरांगे पाटील यांच्यावरून वाद, भाजप-शिवसेना नेत्यांत आरोपांच्या फैरी
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन केलेल्या ५०० कोटींच्या खळबळजनक आरोपानंतर पत्रकार परिषदेतून ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. पुरावा म्हणून जरांगे पाटील यांनी ऐकविलेल्या ऑडिओ क्लिपवरून आता राजकीय वादंग उठले आहे. यावरून आता महायुतीमधील भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत.
जरांगे पाटील यांच्या जवळीकतेवरून बोलताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांची जवळीक होती, असे म्हणत आंदोलन काळात त्यांनी घेतलेल्या भेटीचे, जेवतानाचे फोटो दाखविले. तसेच ही ऑडिओ क्लिप एआय नसून भाजपचीच असल्याचे त्यांनी म्हटले. मनोज जरांगेंना मराठा समाजाने डोक्यावर उचलून घेतले. पण हा माणूस सर्वांना फसवत आहे, असा पलटवार करीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावरून भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांना लक्ष्य केले. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदमांवर हल्ला चढविला.
रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संजय राऊतांसारखे कृत्य करू नये. कुठलीही गोष्ट बोलण्यापूर्वी वरिष्ठांसोबत चर्चा करायला हवी, यात आम्ही आणि त्यांचे नेते उदय सामंत हे सातत्याने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होतो. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम रामदास कदम यांनी करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा पलटवार प्रसाद लाड यांनी केला. शिंदेंना संपविण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय, असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो. कारण एकनाथ शिंदे केवळ शिवसेनेचे नेते नाहीत तर महायुतीचे नेते आहेत. रामदासभाई हेही आमचे नेते आहेत. पण त्यांनी अशी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून ती घ्यायला हवी होती, असे लाड म्हणाले.
दरम्यान, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही. महायुतीत राहून सहका-यांना शिव्या द्यायच्या हे संस्कृतीत बसत नाही. देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कोण कोण ताकद देत होते, याबद्दल आम्ही बोलायचे का, असे प्रत्युत्तर भाजप नेते आ. प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना दिले. आपण एका घरात राहतो. त्यामुळे सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी कदम यांना दिला.
त्यातच आता ऑडिओ क्लिप सुमारे २९ मिनिटांची असून, त्यातील ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मात्र, केवळ या आर्थिक व्यवहारापुरती चर्चा मर्यादित न ठेवता भाजपकडून समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर कथित दबाव आणण्याच्या पद्धतीवरही चर्चा होणे आवश्यक असल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
कदमांकडून फडणवीस,
शिंदेंच्या बदनामीचा कट
जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. कदम हेच सर्व प्रकारच्या षड्यंत्राचे मास्टरमाईंड आहेत. शिंदेसाहेबांच्या मागे साडेसाती लावून ठेवली आहे. मराठ्यात गैरसमज जावा, शिंदे साहेबाला डॅमेज करण्याचे काम रामदास कदम करीत आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.
क्लिपचे सत्य बाहेर आणणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण अडीच वर्षांनंतर बाहेर येण्यामागे नेमका हेतू काय, कोणाला लक्ष्य केले जात आहे आणि यामागे कोण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातील सत्य बाहेर आणले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. शिवसेनेच्या शिष्टमंडळासह भाजपने चौकशीची मागणी केली.
















