बुलडाणा : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. बुलडाण्यातील डोणगावमधील अग्रवाल पेट्रोलपंपासमोर गुरुवारी सकाळीच भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. नागपूर कॉरिडॉरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये आशिष आदिवासी (२१, रा. कुंमरी, जि. आमरोह, मध्य प्रदेश) आणि ज्ञानेश्वर बोरसे यांचा समावेश आहे.
महामार्गावरील झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचे पाणी वापरण्यात येते. त्याच कामासाठी आशिष आणि ज्ञानेश्वर पाण्याचे बॅरल भरून आणण्यासाठी गेले होते. पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना त्यांनी आजूबाजूला न पाहिल्याने हा अपघात घडला. भरधाव कारचालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नियंत्रण सुटल्याने कारने आशिषला जोरदार धडक दिली. आशिषचा जागीच मृत्यू झाला. दुसरा कामगार ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला होता, पण उपचारादरम्यान त्यानेही प्राण सोडले.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.