लातूर : प्रतिनिधी
घरातील प्रत्येक सदस्यांनी जबाबदारी उचलल्यास महिलांवरचा ताण कमी होतो त्यामुळे कुटुंबात प्रत्येक सदस्यांची जबाबदारी महत्त्वाची असते. आई ही कुटुंबाची असते तर माता ही सर्वांची असते. यामुळे कुटुंबासाठी माता होण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ‘आज का वार परिवार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला. राजस्थानी महिला मंडळास या वर्षी ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘आज का वार परिवार’ या एक दिवसीय अधिवेशनच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाम जाजू होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते कमलकिशोर अग्रवाल, अनिल राठी, निता मुंदडा, कुमुदिनी भार्गव, सुलोचना नोगजा, सुजाता लोया, कमला राठी, अर्चना सोमाणी, संयोजक अलका सारडा आदी उपस्थित होते.
व्यक्ती जन्मल्यानंतर तो त्या परिवाराची ओळख बनतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत परिवार हा अविभाज्य घटक आहे. आई-वडिलांना पाहूनच मुले मोठी होत असतात, असे सांगून जिल्हाधिकारी ठाकूर घुगे म्हणाल्या की, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कार व मार्गदर्शन मिळते; पण आई-वडिलांच्या संस्कारातूनच मुले शिकत असतात. या संस्कारातूनच त्यांची वाटचाल ठरत असते. आज मोबाईलच्या दुनियेत प्रत्यक्ष कोणाचाही संवाद नाही तसेच टी. व्ही. पाहण्यात आपण सर्व दंग आहोत. या भौतिक झगमगाटात नाते हासरे आहेत का? असा प्रश्न पडतो आहे.
परिवार एकत्र ठेवण्याचे काम महिला करतात. आज महिलांच्या बरोबरच पुरुषही घराची जबाबदारी उचलताना दिसून येत आहेत. दिवाळीसारख्या सणांमुळे परिवाराची विण घट्ट होते. ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. आज विदेशात एकत्र कुटुंब पध्दती स्वीकारली जात आहे. ही आत्मपरिक्षणाची बाब आहे त्यामुळे आधुनिक व जुने यांचा मिलाप करून संस्कार होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत. सामाजिक कार्यकर्ते अग्रवाल यांनी, महिला या परिवाराचा कणा आहेत त्यामुळे त्यांचे वेगळे महत्त्व आहे. राजस्थानी महिला मंडळाच्या ८०० सदस्यांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य होत आहे. त्यांनी भूकंप, पल्स पोलिओ, कारगील युध्द आदी कार्यात सहभागी होऊन मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलोचना नोगजा यांनी केले. सूत्रसंचालन सरोज बलदवा यांनी केले. आभार अर्चना सोमाणी यांनी मानले.