नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
आज तिहार कारागृहातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. याआधी १२ जुलै रोजी सीबीआयमार्फत तपास करत असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.
केजरीवाल यांनी केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय) ने केलेल्या अटकेला आव्हान देणा-या याचिकेवरील निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी राखून ठेवला आहे. केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.