२ अधिका-यांच्या बदल्या, चौकशी समितीही स्थापन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने ६ जून रोजी होणा-या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. कारण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित मुद्यांवर एक मोठे पाऊल उचलत सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांच्या बदल्या केल्या आहेत. यासोबतच सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अनियमिततेनंतर हे पाऊल उचलले आहे.
सीबीएसईने ऑन-स्क्रीन मार्किंग प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली. ही समिती सखोल चौकशी करेल. या समितीची नियुक्ती क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस. राधा चौहान यांच्याकडे करण्यात आली आहे. गरज भासल्यास त्या इतर विभागांतील अधिका-यांची मदत घेऊ शकतात. या व्यतिरिक्त समितीला सचिवालयीन सहाय्य पुरवण्याची जबाबदारीही क्षमता विकास आयोगावर सोपवण्यात आली आहे. ही समिती एका महिन्याच्या आत आपली चौकशी पूर्ण करून कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला आपला अहवाल सादर करेल. ऑन-स्क्रीन मार्किंग अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून संगणकाच्या स्क्रीनवर तपासल्या जातात. यामुळे उत्तरपत्रिकांची जलद आणि निष्पक्ष तपासणी सुनिश्चित होते, असे सीबीएसईचा दावा आहे.
















