32.7 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeलातूरखरिपासाठी ३ लाख ६२ हजार क्विंटल बियाणे आवश्यक

खरिपासाठी ३ लाख ६२ हजार क्विंटल बियाणे आवश्यक

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर येथे खरीप हंगाम पुर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात ४ लाख ८२ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. यासाठी ३ लाख ६२ हजार २७ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. गतवर्षी खरीप हंगामात १ लाख ८ हजार ६४६ मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला होता, तर यंदा १ लाख १९ हजार ७६० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले
या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव उपस्थित होते.
यंदा हवामान खात्याने चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतक-यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करून दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात गुरुवारी आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतक-यांना बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने विशेष काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतक-यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त शेती शाळांचे आयोजन करावे. बँकांकडून शेतक-यांना वेळेवर कर्जपुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. बनावट बियाणे आणि खते विक्री करणा-यांवर कठोर कारवाई करावी, पालकमंत्री भोसले म्हणाले.
शेतक-यांकडील बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी शेतक-यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे. प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित आमदारांच्या उपस्थितीत खरीप पूर्वतयारी  आढावा बैठक घ्यावी.  गावपातळीवर जनजागृती मोहीम राबवून लागवड पद्धती, बियाणे प्रक्रिया आणि उगवणक्षमता  तपासणी याबाबत शेतक-यांना माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप पूर्वतयारीबाबत सूचना मांडल्या आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात विमा कंपनीचे कार्यालय सुरु करावे, असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि पीएम किसान सन्मान योजना, अ‍ॅग्रिस्टॅक यांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात  आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR