गोंदिया : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या अपघात मदत वैद्यकीय व्हॅनच्या कोचला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.२) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. काही क्षणात आग वाढल्याने कोचमधील साहित्य व सीट जळून राख झाल्या. रेल्वे कर्मचा-यांनी वेळीच उपाययोजना करीत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती.
मंगळवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास या व्हॅनच्या एका कोचमधून धूर निघत असल्याने रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना दिसले. तसेच हा प्रकार रेल्वे स्थानकावरील कर्मचा-यांच्या लक्षात येताच त्यांंनी अपघात मदत व्हॅनकडे धाव घेतली. अग्निशामक यंत्र व पाण्याचा मारा करुन कोचला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
काही वेळातच आग आटोक्यात आली. मात्र आगीमुळे कोचमधील संपूर्ण सीट्स आणि वैद्यकीय मदतीचे साहित्य काही प्रमाणात जळाल्याने नुकसान झाले. मात्र या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती. कोचला लागलेली आग आटोक्यात येईपर्यंत या फलाटावर येणा-या रेल्वे गाड्या दुस-या फलाटावर वळविण्यात आल्या होत्या. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
















