31.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीराजेंनी केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीराजेंनी केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला १९ दिवस उलटून गेले तरीही अद्याप यातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. यात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारच्या कामकाजावर निशाणा साधला आहे.

वाल्मिक कराडला संरक्षण देणा-या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही? मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झाले? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? यामागे कोण आहे? आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का? शोधून काढले तर दोन मिनटं लागतात. कराडच्या संपर्कात कोण आहे? त्याचे खास संबंध कुणाशी आहेत?, असे सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केले आहेत.

राजकीय पाठबळ असल्याशिवाय संरक्षण मिळत नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की तुम्ही या घटनेतील जो खरा आरोपी आहे त्याला अटक करा. अजित पवार हे नेहमी परखडपणा दाखवतात. पण आता तुम्ही देखील अशा लोकांना का संरक्षण द्यायला लागले? महाराष्ट्रात हे जे चाललंय ते तुम्हाला पटतंय का? उद्या अशा घटना वाढल्या तर हे महाराष्ट्राला परवडणारं आहे का? , असा सवाल त्यांनी केला आहे.

या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे. आम्ही देखील वाट पाहत आहोत की राज्य सरकार काय कठोर भूमिका घेते? राज्यात हा बीड पॅटर्न कुठे होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. सरपंचाची हत्या होत आहे. आरोपींचा थेट संबंध दिसून येतो. त्यांची कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे सातबारा पुढे आले आहेत, असे संभाजीराजे म्हणाले.

ही माणुसकीची हत्या
स्वत: पंकजा मुंडे यांनी सभेत सांगितले होते की, वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचे पानही हलत नाही. आज पंकजा मुंडे या देखील या घटनेबाबत जास्त बोलत नाहीत. मग जे बीडमध्ये चाललंय ते तुम्हा दोघांनाही पटतंय का? ही माणुसकीची हत्या आहे. बीडची गुन्हेगारी पाहून मी देखील चकित झालो. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठे आहे? हे माहिती नसणे हे न पटणारे आहे. स्वत: धनंजय मुंडे यांच्या हातात बंदूक असलेला एक फोटो मी पाहिला. यामधून तुम्ही जनतेला काय मेसेज देत आहात? या महाराष्ट्रात आपण अशा गोष्टी खपवून घ्यायच्या का? हे आता चालणार नाही,’’ असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR