मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या व्यवहारावरून पटोले यांनी सरकारला जाब विचारला. वाळूच्या विषयावर भाजपचेच नेते बोलत असल्याचे सांगत त्यांनी या कथित हजारो कोटींच्या प्रकरणात कोणाला पाठबळ मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला. शासनच याला जबाबदार असते आणि शासनानेच यामध्ये भूमिका घ्यायची आहे, असे पटोले म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: भंडा-याच्या शेजारील जिल्ह्यातील मंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती आपण महसूल मंर्त्यांना दिली असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी महसूल मंर्त्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. कुंपणच शेत खातंय. जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात, हे पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. नकली किंवा संशयास्पद निविदा काढून त्यातून कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचे चित्र असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या मते, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जात आहे. मात्र या पैशांचा योग्य वापर होण्याऐवजी त्यात कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
फडणवीस सरकारचा सहभाग
कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहारासाठी पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला जबाबदार धरले. सरकारच यामध्ये सहभागी आहे, फडणवीस सरकारचा सहभाग आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. या सर्व आरोपांमधून सरकार कसे बाहेर पडणार, याकडे काँग्रेसचे लक्ष असल्याचेही पटोले म्हणाले.
कुंभमेळ्याच्या नावाने महाराष्ट्राची बदनामी
कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशभरातील श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या आयोजनातील गैरव्यवहाराच्या बातम्या देशभर पोहोचल्यास महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, असा दावा पटोले यांनी केला. ‘देशभरातील साधू-संत जेव्हा नाशिकमध्ये येतील आणि या सर्व गोष्टींचा खुलासा होईल, तेव्हा सरकारच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचे देशाला दिसेल,’ असे ते म्हणाले.
बनावट वर्गवारीवरूनही सरकारवर निशाणा
कुंभमेळ्याच्या कामांसाठी वापरल्या जाणा-या साहित्याशी संबंधित कथित बनावट वर्गवारीच्या प्रकरणावरही पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत जळगाव येथील एका छपाई केंद्रात बनावट साहित्य छापण्यात आल्याचे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे पटोले यांनी नमूद केले. या प्रकरणात नाशिकच्या पालकमंर्त्यांच्या परिवारातील व्यक्तींचा संबंध असल्याचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर पटोले यांनी राज्यातील परिस्थितीवर टीका करत सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगितले.
मतदारयादीच्या प्रक्रियेवरही पटोलेंची चिंता
मतदारयादीच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेबाबतही नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन कोटी मतदार या प्रक्रियेतून वंचित राहिल्याचा मुद्दा समोर आला आहे. बातम्यांमधून आणि केलेल्या आढाव्यातून सुमारे १० टक्के मतदारांबाबत काही अडचणी असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. काही मतदार उपलब्ध नसणे, काहींचा मृत्यू झालेला असणे अशा कारणांमुळे मतदारयादीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा संधी देण्यासाठी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
















