24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगे, भुजबळ, मुंडेंना पत्र लिहित मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

जरांगे, भुजबळ, मुंडेंना पत्र लिहित मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

पुणे : प्रतिनिधी
मराठासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यातच मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रसाद देठे, असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे.

मूळचे बार्शीतील रहिवासी असलेले प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देठे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आपल्या व्यथा देठे यांनी मांडल्या आहेत.

फक्त ‘मराठा आरक्षण’ मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचे देठेंनी चिठ्ठीत सांगितले आहे. ‘माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही,’ असा उल्लेखही देठेंनी केला आहे. देठेंच्या आत्महत्येनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिठ्ठीत काय?

जयोस्तु मराठा,
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी. पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या, विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझे तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट राहा. मला माफ करा.. तुमचाच प्रसाद.

प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सक्रिय होते. ते सतत सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत होते. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद देठे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात, जरांगे-पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR