19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीय विशेषजिंकू किंवा...

जिंकू किंवा…

काही सीनिअर विद्यार्थी एका ज्युनिअर विद्यार्थ्याला मारहाण करतात. त्याला विवस्त्र करतात. त्याच्या गुप्तांगावर लाथा-बुक्क्या मारतात. त्याचे केस जाळतात. हे वर्णन ऐकून आपल्याला एकच शब्द आठवतो- रॅगिंग. ही समस्या आजची नाही. वेगवेगळ्या वसतिगृहांमधून असे प्रकार पूर्वीपासून घडतायत. केवळ मुलांच्याच नव्हे, तर मुलींच्या वसतिगृहांमध्येही असे प्रकार अपवादात्मक स्वरूपात घडतात. आजकाल यात भर पडलीये ती व्हीडीओ शूटिंगची. ही क्रूर कृत्यं मोबाईल कॅमे-यात शूट करायची आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधिताला आणखी त्रास द्यायचा, असे प्रकार घडतात. कानपूरमधल्या ताज्या घटनेला मात्र एक वेगळाच कोन आहे. वरवर पाहता रॅगिंगची वाटणारी ही घटना ज्या कारणातून घडली, ते अधिक धक्कादायक आहे. स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी गावाहून शहरात आलेल्या मुलाला सीनिअर मुलांनी जबरदस्त मारहाण करून त्याचा छळ केला. त्याचा व्हीडीओ बनवला. केस जाळण्याचा प्रयत्न करतानाच गुप्तांगाला वीट बांधून व्हीडीओ काढण्यात आला.

या अत्याचाराला कारण ठरलं वीस हजार रुपयांचं कर्ज आणि त्याला कारण ठरला ऑनलाईन जुगारी खेळ! संबंधित अल्पवयीन मुलाला या ऑनलाईन सट्टेबाजीचं व्यसन जडलं होतं. त्यातून निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी सीनिअर मुलांकडून त्याने कर्ज घेतलं. सगळे पैसे ऑनलाईन जुगारात गमावल्यानंतर सीनिअर मंडळींनी त्या मुलाकडून वीस हजारांच्या मोबदल्यात तब्बल दोन लाख रुपये मागितले आणि प्रकरण मारझोड करण्यापर्यंत पोहोचलं. या प्रकरणात सहा तरुणांना अटक झाली आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न झाले आणि व्हीडीओ बाहेर आल्यानंतर त्याकडे लक्ष वेधलं गेलं, असा आरोप होतोय. यातील सत्यासत्यता तपासता येईल; परंतु ऑनलाईन गेमिंगची वावटळ आपल्या घरात कधी शिरेल, याचा नेम नाही हे मात्र प्रत्येकाने गांभीर्याने घ्यायला हवं. ‘आरएमजी’ म्हणजेच रिअल मनी गेम्समुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत; होत आहेत,

हे अत्यंत कडवट वास्तव स्वीकारून हे प्रकरण प्रत्येकाने आपल्या घराच्या दारात रोखलं पाहिजे. ‘तणावमुक्त’ या गोंडस नावाखाली या गेम्सकडे वळणारी माणसं अंतिमत: तणावग्रस्तच झाली आहेत. जिज्ञासा, आकर्षण, व्यसन, कर्जबाजारीपणा आणि त्यातून नको ते प्रसंग असा प्रवास अनेक घरांना पाहावा लागलाय. विशेष म्हणजे, एका ताज्या अहवालानुसार गेम्सच्या आहारी गेलेल्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. दहातला एखादा डाव जरी जिंकला, तरी पुढे खेळावं आणि अधिक रक्कम जिंकावी असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. असं वाटताक्षणी हा प्रवास थांबवला पाहिजे; पण दुर्दैवाने तसं होत नाही. प्रसंगी कर्ज काढून ‘इझी मनी’चा पाठलाग केला जातो, हेच वास्तव! ऑनलाईन खेळणा-यांना ऑनलाईन कर्ज देणारेही सहज शोधता येतात; पण ही कर्जं अधिकृत नसतात आणि त्यांचे व्याजदर अव्वाच्या सव्वा असतात. दुसरीकडे, जाहिरातबाजीपासून इव्हेन्ट स्पॉन्सरशिपपर्यंतचे हातखंडे वापरून ऑनलाईन गेम्सचा अफाट प्रचार चाललाय. आवडत्या सेलिब्रिटींपासून ‘मी इतके-इतके जिंकले,’ असं सांगणा-या सर्वसामान्य चेह-यांपर्यंत सगळेच या गेम्सकडे आकर्षित करून घेतायत. कर्जामुळं घर सोडून निघून जाणं, प्रसंगी आत्महत्या करणं अशाही घटना घडल्यात. जिंकण्याची आकांक्षा चांगलीच; पण तिला जुगारी वृत्तीची जोड मिळाली, तर खड्ड्यात पडण्यावाचून गत्यंतर नाही!

-हिमांशु चौधरी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR