हिंदी सक्ती रद्द, जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!

केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र स्वीकारून पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय सरकारच्या चांगलाच अंगलट आला आहे. या विषयामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या विरोधकांना आक्रमक होण्याची संधी तर दिलीच, पण गेली १९ वर्षे एकमेकांकडे बघण्याचे टाळणा-या उद्धव व राज ठाकरे यांनाही एकत्र आणले. दोन महिन्यांपूर्वी याबाबतचा जो पहिला आदेश निघाला त्यात हिंदी अनिवार्य असेल असे नमूद करण्यात आले होते. त्यावरून वादळ उठण्यास सुरुवात झाल्यावर मग अनिवार्य हा शब्द वगळून नवे आदेश काढले गेले. शब्द वगळला तरी आशय तोच होता. त्यामुळे विरोधाचे लोण पसरायला लागल्यावर सुरुवातीला या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न झाला. तो अंगाशी येतोय म्हटल्यावर सारवासारव सुरू झाली. हिंदीची सक्ती नाही, तो ऐच्छिक विषय आहे. तो केवळ मौखिक शिकवला जाईल, असे हास्यास्पद युक्तिवाद केले. कोवळ््या मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न अंगाशी येतोय हे लक्षात आल्यानंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने याबाबत सपशेल माघार घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, असे सूचक वक्तव्य करून आधीच याचे संकेत दिले होते. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला. या विषयावर विरोधक एकत्र आले असताना सरकारमधील तीन पक्षातला विसंवाद यामुळे चव्हाट्यावर आला. अजित पवार यांनी आधीच पहिलीपासून हिंदी विषयाचे ओझे टाकणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. शिक्षण खाते शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे असल्याने टीकेच्या तोफा त्यांच्यावर धडाडत असल्या तरी हा केवळ त्यांचा निर्णय नक्कीच नसेल हे स्पष्ट दिसत होते. मग हा निर्णय नेमका कोणाच्या पातळीवर व कशासाठी घेण्यात आला होता, त्यासाठी एवढा अट्टाहास कोणाचा होता ? यामागे नेमके उद्दिष्ट काय? याबाबत खोलात जाऊन चर्चा होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने मनसे, उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन रान उठवले. त्याचे परिणाम लक्षात आल्यावर सरकारही बॅकफुटवर आले. हिंदीसक्तीचे दोन्ही शासन आदेश रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्रिभाषा सूत्रसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे ५ जुलै रोजी आता मोर्चा निघणार का, निघाला तर त्याला किती प्रतिसाद मिळणार, विजय साजरा करण्यासाठी दोन ठाकरे एकत्र येणार का, याबद्दल उत्सुकता असणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हिंदी सक्तीची करण्यात आल्याचा सर्वसाधारण समज आहे. राष्ट्रीय धोरणात त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार करण्यात आला असला तरी त्यात हिंदीचा थेट उल्लेख नाही. आम्ही कोणत्याही राज्यावर हिंदी लादत नाही आहोत, असे दाखवतानाच, राज्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी स्वीकारतील अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. दक्षिणेतील राज्यांनी हे धोरणच धुडकावून लावले. पण महाराष्ट्राने ते स्वीकारले व राष्ट्रीय धोरणात हिंदीचा स्पष्ट उल्लेख नसतानाही हा पर्याय निवडला. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भाषेसंदर्भात भाषेबद्दल राज्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात किमान पाचवीपर्यंत आणि शक्य असल्यास ८ व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून, तेथील स्थानिक भाषेतून दिले जावे असे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी मातृभाषेचे वाचन, लेखन कौशल्य विकसित झाल्यावर इयता तिसरीपासून इतर भाषा शिकवता येतील, असे म्हटले आहे. त्रिभाषा सूत्रात लवचिकता असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही, असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार २०२३ साली केंद्र सरकारने जो ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ तयार केला. त्यातही त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करण्यात आला असला तरी तिसरी भाषा हिंदीच असली पाहिजे, असा उल्लेख कुठेही नाही. मात्र त्रिभाषा सूत्राचा स्वीकार करणे आवश्यक केले की स्थानिक प्रादेशिक भाषा, नंतर इंग्रजी व तिसरी भाषा म्हणून राष्ट्रीय पातळीवरील राजभाषा असलेली हिंदी राज्ये आपोआप स्वीकारतील, असा धोरणकर्त्यांचा अंदाज असावा आणि आपण तेच केले. केंद्र सरकारचं राष्ट्रीय शिक्षण धोरण महाराष्ट्रात लागू करण्यासाठी राज्य सरकारनं १६ एप्रिल २०२५ ला पहिला शासन आदेश जारी केला. त्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

सध्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोन भाषा शिकवल्या जातात. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी व इंग्रजीसह तीन भाषा शिकवल्या जातात. आता राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील, असे या १६ एप्रिलच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. यावरून वादंग झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जीआरचे समर्थन करताना सगळ््यांना मराठी आलीच पाहिजे आणि त्यासोबत देशाची भाषाही आली पाहिजे, या दृष्टीने केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात फक्त मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे सर्वांना मराठी शिकावंच लागेल, मात्र सोबत इंग्रजी, हिंदीही शिकू शकतील. याशिवाय आणखी कुठली भाषा शिकायची असल्यास तीही शिकू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले. यामुळे राष्ट्रीय धोरणात हिंदीचा थेट उल्लेख नसला तरी देशात एकच संपर्क भाषा असावी हा केंद्राचा हेतू असल्याचे स्पष्टपणे समोर आले.

हिंदी सक्ती नेमके पाप कोणाचे ?
विविधतेने नटलेला देश ही भारताची ओळख आहे. अनेक भाषा, वेगवेगळ्या संस्कृती, वेगळे धर्म, असंख्य जाती आणि पोटजाती असूनही या विविधतेत असलेली एकता ही भारताची शक्ती आहे. पण भाजपा व त्यांच्या परिवारातील संघटनांना ‘एक देश, एक भाषा’ हे धोरण असेल तर अधिक एकसंघ होईल असे वाटते. त्यामुळे राजभाषा असलेल्या हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान द्यावे अशी त्यांची भूमिका आहे. केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातले बदल त्याच हेतूने केले गेले असल्याचा आरोप विरोधक करतात. यामागे भाजपाचा राजकीय हेतू असल्याचाही आरोप आहे. हिंदी भाषिक राज्यात, हिंदी पट्ट्यात भाजपाला मोठे यश मिळते. पण हिंदीचा प्रभाव कमी असलेल्या राज्यांमध्ये, विशेषता दक्षिणेत भाजपाला नेटाने प्रयत्न करूनही बस्तान बसवता आलेले नाही. त्यामुळेच तेथे हिंदीला तिसरी भाषा म्हणून घुसवण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप आहे. मुंबईचे हिंदीकरण झालेच आहे. आता महाराष्ट्राचेही हिंदीकरण करायचे आहे का ? असाही प्रश्न विचारला जातोय. एकीकडे भाजपाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदीकरण चालवल्याचा आरोप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचा सगळा प्रवास सांगताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच या निर्णयाची पूर्वतयारी केली होती, असा आरोप केला. केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सर्वप्रथम कर्नाटकाने नंतर तेलंगणा आणि नंतर उत्तर प्रदेशने स्वीकारल्याचे निदर्शनास आणले.

२१ सप्टेंबर २०२० रोजी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे लागू करायचे यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. १६ ऑक्टोबर २०२० ला त्याचा जीआर काढला. नामवंत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली १८ लोकांची समिती उद्धव ठाकरे यांनीच नियुक्त केली. या समितीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उपनेते विजय कदम हेही होते. या समितीने १४ सप्टेंबर २०२१ ला १०१ पानाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला. या अहवालात मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी भाषेचा दुसरी भाषा म्हणून समावेश करावा, अशी शिफारस करण्यात आली होती. १४ सप्टेंबर २१ ला हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात आला. त्या बैठकीच्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. यानंतर अहवालाच्या अंमलबजावणीसाठी उद्धव ठाकरे सरकारनेच एक समिती नेमली होती. त्याच समितीच्या कामावर आमच्या काळात जीआर निघाले, असे सांगत हिंदीचा समावेश करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांचाच आहे व आता ते आपल्याच निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

मराठीसाठी तरी पुरेसे शिक्षक आहेत का ?
तिसरी भाषा हिंदी असावी असा स्पष्ट उल्लेख नसतानाही राज्याने ती स्वीकारण्याचे कारण देताना हिंदीच्या शिक्षकांची उपलब्धता हे कारण दिले आहे. अनिवार्य या शब्दाला विरोध झाल्यानंतर ‘अनिवार्य’ हा शब्द वगळून त्या जागी ‘सर्वसाधारणपणे’ हा शब्द घालण्यात आला. ‘हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा असल्यास मान्यता देण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र ती भाषा शिकण्याची इच्छा असलेल्यांची संख्या किमान २० असेल तरच शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल अन्यथा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागेल, अशी अट घालण्यात आली.
विरोध केवळ हिंदीला नाही, तर त्रिभाषा सूत्राला आहे, हे समजून घेण्याची सरकारची तयारी नव्हती. आपण मराठीची आणि पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली असली तरी त्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. असे असताना हिंदी किंवा अन्य भारतीय भाषेसाठी शिक्षक कसे उपलब्ध करून देणार? हा प्रश्नदेखील आहेच.

ठाकरे बंधूंच्या राजकारणाला संजीवनी !
हिंदी सक्तीच्या मुद्यावरून सरकारची कोंडी झाली आहे. विरोधक एकवटले आहेत. राज व उद्धव ठाकरे ५ जुलैला एकत्र मोर्चा काढणार आहेत. एकूण रागरंग बघता या मोर्चाआधी हिंदीचा निर्णय स्थगित करण्याची घोषणा करून आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होऊ शकेल. परंतु विरोधकांना मिळालेला हा बुस्टर डोस निष्प्रभ होणार नाही. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष होत आली तरी अजून आपलं मूळ रुजवता आलेले नाही. किंबहून पहिल्या निवडणुकीत मिळालेले यश पुन्हा कधीही मिळवता आलेले नाही. राज्याची सूत्र माझ्याकडे द्या मी महाराष्ट्र घडवतो, असे म्हणणा-या राज ठाकरे यांना २८८ सदस्यांच्या विधानसभेत एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची अवस्था विधानसभा निवडणुकीनंतर अधिकच बिकट झाली आहे. पक्ष फुटला, पक्षाचे नाव, चिन्ह हातातून गेले. मुंबई महापालिका हा आशेचा शेवटचा किरण आहे. तेथे सत्ता मिळाली नाही तर अजूनही सोबत असलेले २० आमदार व कार्यकर्ते पांगायला वेळ लागणार नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे सर्व लक्ष या निवडणुकीवर केंद्रित करून त्यांनी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळाले असून, दोघांनाही या निमित्ताने नवसंजीवनी मिळाली आहे. सरकारने हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर माघार घेतल्याने ५ जुलै चा मोर्चा निघणार का? याबद्दल स्पष्टता झालेली नव्हती. पण सरकारची माघार ही मराठीची ताकद एकवटली तर काय होऊ शकते हे दाखवणारी होती. त्यातून प्रेरणा घेऊन दोन ठाकरे आणखी जवळ येणार का? हे बघावे लागेल. आगामी राजकारणाच्या दृष्टीने पुढचे पाऊल खूप महत्त्वाचे आहे.

२००६ साली उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करून आपला स्वतंत्र पक्ष निर्माण केला होता. तेव्हापासून त्यांच्या दोघात कोणताही संवाद नव्हता. रक्ताच्या नात्यामुळे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र यावे लागले तरी संवाद टाळण्याचा प्रयत्न असायचा. किंबहुना अशा ठिकाणी एकाच वेळी पोचणार नाही, याची दक्षता घेतली जात असे. पण राजकारणात बिकट परिस्थिती झाल्याने दोघांनाही एकत्र यावेसे वाटायला लागले आहे. मुळात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसदारीच्या वादातून हे वेगळे झाले असल्याने तो दावा असेल तोवर एकत्र येणे सोपे असणार नाही. तरीही हिंदी सक्तीच्या मुद्द्याचे किमान आंदोलनात एकत्र येण्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी मान्य केली आहे. संवाद सुरु झाला आहे. तो कुठपर्यंत पुढे जातो ते बघावे लागेल. पण हे दोघे एकत्र आले तर किमान मुंबईचे राजकारण नक्की बदलू शिरतात. मुंबईतील मराठी माणसांचा डीएनए शिवसेनेचा आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका असली तरी महापालिकेत शिवसेना हवी, अशा पद्धतीने अनेकदा मुंबईकरांनी कौल दिला आहे. २०१४ नंतर राजकारणातले सगळे ठोकताळे बदलले असले तरी ठाकरे बंधूंचे एकत्र आले तर मोठी उलथापालथ होऊ शकते. हिंदी सक्तीने दोन भावांच्या उतरणीला लागलेल्या राजकारणाला संजीवनी दिली आहे, एवढे नक्की. हिंदी सक्तीमुळे मराठीचा मुद्दा उचलून धरणा-या ठाकरे बंधूंना फायदा होईल का ? असे विचारले असता, आम्ही काय पंजाबी आहोत का ? असा प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही राजकीय लाभ मिळणार नाही, असे सूचित केले. पण या मुद्द्यामुळे बिघडलेल्या राजकारणाची उद्विग्नता त्यांना लपवता आली नाही. सरकारने हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर माघार घेतल्याने ५ जुलै चा मोर्चा निघणार का ? याबद्दल स्पष्टता झालेली नव्हती. पण सरकारची माघार ही मराठीची ताकद एकवटली तर काय होऊ शकते हे दाखवणारी होती. त्यातून प्रेरणा घेऊन दोन ठाकरे आणखी जवळ येणार का ? हे बघावे लागेल.

-अभय देशपांडे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
48:16
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news