28.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeपरभणीजिंतूर तालुक्यातील शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

जिंतूर तालुक्यातील शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

परभणी : जिंतूर तालुक्यातील शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साप्ताहिक आंदोलनाला परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसने आज ठाम पाठिंबा दर्शविला. करपरा नदी पात्रात, निवळी खुर्द गावाजवळ सुरू असलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांसमवेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे म्हणजे येलदरी धरणातून कालवा काढण्याची मागणी, करपरा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण, तसेच नव्याने बदलण्यात येत असलेली पीक विमा योजना त्वरित रद्द करून ती पुन्हा जुन्या स्वरूपात लागू करणे. शेतक-यांची कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती करा ही मुख्य मागणी आंदोलकांनी अधोरेखित केली.

या आंदोलनात काँग्रेसचे अमोल जाधव म्हणाले, पीक विमा योजना फक्त कागदावरच राहिली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ अशा आपत्तींनंतरही शेतक-यांना भरपाई मिळत नाही. सरकारच्या धोरणांमुळे शेतक-यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आंदोलने हीच त्यांची शेवटची आशा राहिली आहे.
जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित म्हणाले, शेतक-यांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी सरकार निवडणुकीच्या तोंडावर खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडते. आता वेळ आली आहे की शेतक-यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव आणावा.

या कार्यक्रमात दिगंबर खरवडे, इर्शाद पाशा यांनीही आपली मते मांडली. तर शेतकरी संघटनेचे हनुमान आमले यांनी आपल्या कवितेमधून शेतक-याची व्यथा प्रभावीपणे व्यक्त केली. या वेळी इरशाद पाशा, चंद्रकांत देशमुख, वशीष्ट ठोंबरे, अजिंक्य भोसले, आदेश पारवे, रोशन पारवे, भाऊसाहेब देशमुख, पंढरीनाथ घाटु्‌ड, वैभव अंभुरे, रमेश अंभुरे, मोबीनभाई, अलीमभाई, अगंद ठोंबरे, शंकर ठोंबरे, आमोल ठोंबरे, बालासाहेब ठोंबरे, सुनील खिस्ते, नितीन खिस्ते, गणेश कंठाले, सुदाम गोडसे, रामकिशन ससे, प्रभाकर तडेकर, प्रदीप ठोंबरे, गंगाधर ठोंबरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. साप्ताहिक स्वरूपातील हे आंदोलन २२ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR