लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असेलेल्या पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसापांसून ढगाळ वातावरण असून, सूर्यदर्शनच नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४००.८ मिलीमिटर पाऊस पडला असून, बुधवारी जिल्हाभरात संपूर्ण दिवसभर संततधार होती. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यातत १९ जुलैपासून पावसाचा जोर वाढला. गेल्या आठवडयातील दोन दिवस सोडले तर पावसाच्या सरी कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४००.८ मिलीमिटर पाऊस पडला असून, सर्वच तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शहरासह जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. असे वातावरण पिकांवरील रोगराईला आमंत्रण देत आहे. जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. लातूर शहरसह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकंना कसरत करावी लागत होती.