लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे काढण्यासाठी राज्य क्षयरोग नियत्रंण व प्रशिक्षण केंद्राकडून एक एक्स-रे व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आली होती. या व्हॅनद्वारे जिल्ह्यात ३ जून ते ८ जून या कालावधीत ५३६ संशयित रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले.
जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबिवले जात आहेत. या अंतर्गत क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावंर औषधोपचार केले जात आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणे, ताप असणे, वजणात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त्त पडणे, मानेवर गाठ येणे आदी क्षयरोगाची लक्षणे समजली जातात. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण असले तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ला घेणे गरजेचे आहे. एक्स-रे व्हॅनच्या माध्यमातून औसा तालुक्यात (उजनी-३३), लातूर तालुका (जवळा-२५, भातांगळी-२९), जळकोट तालुक्यात (वांझरवाडा-११५, अतनूर-११९), निलंगा तालुक्यात (हलगरा-२१, औराद शहाजनी-५३), शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ११९ व देवणी तालुक्यात (वलांडी-२२) असे एकूण ५३६ एक्स-रे काढण्यात आले आहेत. एक्स-रेद्वारे निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना सरकारी दवाखान्यातून मोफत तपासणी व औषध उपचार दिले जातील. तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीत शासनामार्फत प्रतिमहा ५०० रुपये पोषण आहारासाठी दिले जातात.
पुणे येथील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. डी. के रुपनर यांच्या नियोजनानुसार मोबाईल एक्स-रे व्हॅनद्वारे संशयितांचे एक्स-रे करण्यात आले आहेत. तसेच राज्य क्षयरोग नियत्रंण सोसायटीतर्फे चिंतामणी साठे, गिराम क्ष-किरण तंत्रज्ञ व शशिकांत लोहार यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, एसटीएलएस, टीबीएचव्ही, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.