चर्चेला उधाण, आष्टीकर, सत्तार, बांगर सोबत
मुंबई : प्रतिनिधी
हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या तिघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली आणि पुन्हा जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार का, यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ््या चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.