23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमनोरंजन‘डिस्को डान्सर’ मिथून चक्रवर्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

‘डिस्को डान्सर’ मिथून चक्रवर्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई : बॉलिवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा ८ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, मिथुन दा यांचा सिनेविश्वातील प्रवास उल्लेखनिय असून, अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडकर्त्या ज्युरींनी हा पुरस्कार भारतीय सिनेमातील विलक्षण योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्याचे ठरवले, हे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे.असे वैष्णव यांनी शेअर केलेल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार मिथुन दाला प्रदान केला जाणार आहे.

मिथुनचा जन्म १६ जून १९५० रोजी कोलकाता याठिकाणी झाला. त्यांच्या कारकिर्दीविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. मिथुनच्या नावावर ३५० हून अधिक सिनेमे आहेत.१९७६ मध्ये आलेल्या ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली.

या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. १९८२ मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती सुपरस्टार झाले. या चित्रपटाने परदेशातही उत्कृष्ट व्यवसाय केला . त्यानंतर मिथुन दा यांनी ‘तेरे प्यार में, ‘प्रेम विवाह, ‘हम पांच, ‘डिस्को डान्सर, ‘हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथसह अनेक चित्रपटात दमदार अभिनय केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR