तांदूळजा : वार्ताहर
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील वशिष्ठ गोंिवद झारे यांचा दोन एकर व अभिमन्यू बाबाराव गणगे यांचा दोन एकर असा एकंदरीत चार एकर ऊस महावितरणच्या पोलवरील ११ केव्ही च्या तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना दि.१८ फेब्रुवारी रोजी रविवार च्या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
विद्युततारांच्या घर्षणांनी पडलेल्या ठिणग्यांनी आजूबाजूच्या उसाच्या पाचटीने पेट घेतल्याने आग लागली व लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. यातच वाळलेल्या पाचटीने ऊसाला आग लागली व ही लागलेली आग पाहताच शेजारील शेतकरी व गावकरी यांनी त्या आगी ला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु झळ्यामुळे त्यांना अपयश आले. या आगीमध्ये दोन्ही शेतक-यांचे जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे संबंधित शेतक-यांंनी सांगितले. महावितरण कंपनीने सदर घटनेचा पंचनामा करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यातून होत आहे.