पुणे : प्रतिनिधी
राज्यात उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली आहे. अशात बाजारपेठांमध्ये सध्या टरबूज, द्राक्षांचे आणि रसदार फळांची विक्री करताना भरगच्च ठेले पाहायला मिळत आहेत. उन्हाच्या वाढत्या तापमानाबरोबरच या फळांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असून, विक्रेत्यांच्या चेह-यावर समाधान दिसत आहे. बाजारात उन्हाळी फळांच्या खरेदीकडे ग्राहक जास्त आकर्षित होत आहेत. दररोज ३० टन टरबूजांची आवक तसेच विक्री होत आहे. यंदा द्राक्ष, टरबूज ही उन्हाळी फळे स्वस्तात मिळत आहेत. परिणामी, या रसदार फळांची विक्री ४० टक्क्यांनी वाढली आहे.
शरीराला थंडावा देणारे आणि तहान भागवणारे टरबूज सध्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. दिवसाला शेकडो किलो टरबूज विकले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. अनेक ठिकाणी थेट ट्रकमधून टरबूज विक्री केली जात आहे. दर किमान १५ रुपये किलोपासून सुरू असून, मोठे टरबूज सरासरी १०० ते १५० रुपयांत विकले जात आहे.
काळ्या द्राक्षांना मागणी वाढली
विशेषत: काळ्या द्राक्षांना मोठी मागणी असून, ६०-८० रुपये किलो दराने ती विकली जात आहेत. त्याचबरोबर कलिंगडदेखील रसाने भरलेले असल्याने ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण
शहरातील प्रमुख फळबाजारात संध्याकाळच्या वेळेत फळांच्या गाड्यांभोवती ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. अनेकजण घरी जाताना या फळांची खरेदी करताना दिसतात. फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यापेक्षा विक्रीत जवळपास ३०-४० टक्के वाढ झाली आहे.
फळांचे दर आणि विक्री
सध्या टरबूज १५-२० रुपये किलो, तर द्राक्ष ६०-८० रुपये किलो दराने विकले जात आहेत. काही ठिकाणी चवीनुसार किमतीत थोडा फरक आहे. विक्रेत्यांनुसार, मागणी इतकी आहे की काही वेळा संध्याकाळपर्यंत साठा संपून जातो.