लातूर : प्रतिनिधी
थकित मालमत्ता करापोटी मनपाने वसुली मोहीम तीव्र केली असून गुरुवार दि. ३० मे रोजी सहा गाळ्यांना सील ठोकण्यात आले. महानगरपालिकेने ५ लाख रुपयांचा करही वसूल केला. मनपाच्या मालकीची शहरात व्यापारी संकुले आहेत. या संकुलातील कांही गाळेधारकांनी मालमत्ता कर थकवला आहे. या गाळेधारकांकडे असणारा कर वसूल करण्यासाठी पालिकेने ही विशेष वसुली मोहीम सुरु केली आहे. मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये गुरुवारी वसुली पथकाने एकूण ६ गाळे सील करुन ५ लाख रुपयांचा कर वसूल केला. मनपाच्या मालकीच्या सारोळा रोड येथील व्यापारी संकुलातील चार गाळे सील करण्यात आले. गांधी मैदान साईट क्रमांक १११ व ११२ व्यापारी संकुलातील दोन गाळे पथकाने सील केले.
या व्यापारी संकुलात २ लाख रुपयांचा कर वसूल झाला. तसेच गांधी चौक व्यापारी संकुल येथील गाळेधारकांकडून ३ लाख रुपयांचा कर वसूल झाला. शहरातील व्यापारी संकुलात असणा-या ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे त्यांनी आपल्याकडील बाकीचा भरणा तात्काळ करून मनपाला सहकार्य करावे. जे गाळेधारक थकबाकी भरणार नाहीत त्यांच्यावर याच पद्धतीने कार्यवाही केली जाईल, असा इशाराही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दिला आहे.