लातूर : प्रतिनिधी
लातूर, नांदेड व धाराशिव या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील तीन्ही जिल्ह्यांतून एकुण १ लाख ८ हजार ९२५ विद्यार्थी दहावीची तर ९५ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
यंदा विद्यार्थी संख्येचा विचार करुन परीक्षा केंद्रात वाढ करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा ४१३, बारावीची परीक्षा २४९ केंद्रांवर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवार-मार्च महिन्याच्या आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. यंदाच्या परीक्षांचे नियोजनाचे काम सुरु आहे. लेखी परीक्षेला जवळपास १७ ते १८ दिवस शिल्लक आहेत.
लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांतील १ लाख ८ हजार ९२५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. नांदेड ७३५, लातूर ६८२ तर धाराशिवमधील ४३१ अशा १ हजार ८४८ शाळांमधील आहेत. बारावीच्या परीक्षेस ९५ हजार ६७९ विद्यार्थी बसणार आहेत. हे विद्यार्थी नांदेडमधील ३४६, लातूरमधील ३७२ तर धाराशिवमधील १८१ अशा एकुण ८९९ महाविद्यालयातील आहेत., असे लातूर विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा दि. २४ जानेवारीपासून सूरु झाली. ती १० फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे. लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा ३ फेबु्रवारीपासून सुरु झाली. ती २० फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे. तर लेखी परीक्षा २१ फेबु्रवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा दहावी-बारावीची परीक्षा दहा दिवस आधी होत आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरु असून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.