मुंबई : प्रतिनिधी
भाजपाके लोग बौखला ये है! यांच्या मानसिक गोंधळाची आम्हाला चिंता वाटते. देवेंद्र फडणीस यांना उपचाराची गरज आहे, जनतेला संविधानाने मतदानाचा अधिकार दिला त्यामुळे त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवारालाच मतदान करतील. भाजपाला संविधान बदलायचे आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे धर्मयुद्ध असल्याचे म्हणतायत. मात्र हे धर्मयुद्ध कोणत्या धर्माचे असेल तर ते महाराष्ट्र धर्माचे असेल, असा दावा संजय राऊत केला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्धाच्या विधानावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांचे डोके ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचा सोडा पाकव्याप्त काश्मीर मिळवून दाखवा, तिकडे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, मणिपूरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा.
तुम्हाला मत मिळत नाही म्हणून जिहाद का? २०१४ ला मुस्लिम समाजाने मोदींना मते दिली होती मग तोच जिहाद झाला का? राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्र झोपला नाही, महाराष्ट्र जागाच आहे. म्हणून तुम्हाला लोकसभेत महाराष्ट्राने झोपवले, असा टोला राऊतांनी लगावला. तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही म्हणून आम्ही जागे आहोत. आम्ही झोपलो असतो तर भाजपाने अर्धा सातबारा उद्योगपतींच्या नावावर केला असता, असा चिमटा देखील राऊतांनी काढला.
एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यांनी ‘व्होट जिहाद’चा नारा दिला आहे, आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, असे यावेळी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.