मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी करुणा मुंडे पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईने आत्महत्या केली. तसे आपल्याकडे पुरावे आहेत, असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
तसेच मनोज जरांगे यांच्या भेटीवर भाष्य करताना, पुन्हा एकदा सर्व पुरावे घेऊन भेटणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय धनंजय मुंडेंबरोबर मंत्री पंकजा मुंडेंवर देखील त्यांनी निशाणा साधला.
करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी अगोदर सांगितले होते की, अंगावर आले, तर शिंगावर घ्या, त्या अगोदर पंकजा मुंडे यांनी देखील कोयते घासून ठेवा, असे म्हटले होते . हे फक्त आपल्या समाजाच्या लोकांसाठी आहे. हे लोक स्वत: काही करत नाहीत. फक्त लोकांनी करायचं. मी अंगावर गेले होते, परळी विधानसभेमध्ये अर्ज देखील भरला होता. पण माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अर्जाचा सूचक होता, त्याला उचलून नेले.
दमदाटी केली. मी अंगावर आली होती, घ्यायचे होते शिंगावर, होऊन जाऊन द्यायचे होते, नवरा-बायकोमध्ये लढाई. पण तुम्ही तसे केले नाही. मोठ्या मोठ्या भाषणामध्ये लोकांची दिशाभूल करणार. कोयते घासून ठेवा, अंगावर आले तर शिंगावर घ्या, एवढंच म्हणत राहणार.

