नंदुरबार : प्रतिनिधी
मिरची आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजारात गेल्या चार दिवसात दर दिवशी १० हजार कट्टे हिरवी मिरची बाजारात येत असून मागणी कमी असल्याने या मिरचीला मातीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. प्रामुख्याने आखाती देश आणि बांगलादेशातून मागणी नसल्याने नंदुरबारच्या मिरचीचा ठसका हंगामाच्या तोंडावरच कमी झाला आहे.
गेल्या वर्षात कापूस पिकापेक्षा मिरची उत्पादनाने शेतक-यांना स्थैर्य दिल्याने यंदा नंदुरबार जिल्ह्यात साडेआठ हजारापेक्षा अधिक हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. यात गौरी या वाणाला शेतक-यांना पसंती दिल्याने सर्वत्र हिरवीगार मिरचीचे उत्पादन सुरु झाले आहे. प्रारंभीच्या काळात झाडावर येणारी ही मिरची तोडून लाल मिरचीची प्रतीक्षा करण्यात येते.
यंदा प्रारंभीच्या काळातच झाडांवर लगडणा-या मिरच्यांची संख्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने बाजारात हिरव्या मिरचीची प्रचंड आवक होत आहे. अनंत चर्तुदर्शीनंतर नंदुरबार बाजारात पहिल्या दिवशी १० हजार कट्टे मिरची आली होती. या मिरचीला १२ ते १५ रुपयांपर्यंतच भाव मिळाल्याने शेतक-यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
लाल मिरचीच्या हंगामाकडे शेतकरी बांधवांचे लक्ष
नंदुरबारात हिरवी मिरची प्रारंभीच्या काळात ढेपाळल्याने लाल मिरचीच्या हंगामाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यंदा पंजाबमधील केचअप तयार करणा-या उद्योजकांनीही नंदुरबारकडे पाठ केल्याने हिरवी मिरचीचे दर कोसळत आहेत. येत्या काळात यात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
















