Homeमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

नंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

गर्भवती महिलांवर उपचार व प्रसूती केल्याचा संशय

नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात चक्क एक बी.ए. पास तरुण डॉक्टर बनून आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी जनजागृती टीमचे राकेश पावरा यांनी या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधून आलेला ‘बीवस बाला’ नावाचा हा भामटा गेल्या पाच वर्षांपासून वावी आणि परिसरातील दुर्गम पाड्यांवर बेधडकपणे दवाखाना चालवत होता. आरोग्याची कोणतीही पदवी किंवा रीतसर परवाना नसताना त्याने इथे आपला जम बसवला होता. स्थानिक आदिवासी बांधव उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर त्याच्याकडे येत होते, ज्याचा फायदा घेत त्याने मोठी फसवणूक सुरू ठेवली होती.

प्रसूती करत असल्याचा दाट संशय
आदिवासी जनजागृती टीमने जेव्हा या बोगस दवाखान्यावर धाड टाकली, तेव्हा तिथले दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले. या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर प्रेग्नेंसी किट्सचा खच आणि वापरलेल्या सलाईनच्या बाटल्यांचा ढीग आढळला. आरोग्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना हा बोगस डॉक्टर चक्क गर्भवती महिलांची प्रसूती करत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. जर हे सत्य असेल, तर दुर्गम भागातील माता आणि बालमृत्यूच्या घटनांना असे बोगस डॉक्टरच जबाबदार असल्याचे अधोरेखित होत आहे.

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
एकीकडे सरकार आरोग्य सेवा घराघरांत पोहोचल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या नाकाखाली पाच वर्षे हा गोरखधंदा सुरू कसा होता? असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे. दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था आणि डॉक्टरांची कमतरता यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचे फावते आहे का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR