शिवमहापुराण कथेतील हजारो भक्तांची तारांबळ,सुरक्षितस्थळी हलविले
नांदेड : प्रतिनिधी
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत अक्षरश: झोडपून काढले. ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाचा कौठा भागात आजच सुरू झालेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणकथेलाही मोठा फटका बसला. कारण जोरदार पावसामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी, चिखल झाल्याने भाविकांचे हाल झाले. शिवपुराण कथेसाठी नांदेड शहरासह आसपासच्या सर्वच जिल्ह्यांतील भाविकांसह परराज्यातील भाविकांची गैरसोय झाली. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले आणि लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि पोलिसांच्या मदतीने नजीकचे मंगल कार्यालय, शाळा आणि गुरुद्वारात भाविकांना हलविले.
नांदेड शहरालगत असलेल्या कौठा येथील मोदी मैदानावर आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार प. पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २३ रोजी दुपारी या महापुराण कथेस सुरूवात झाली. ही कथा ऐकण्यासाठी नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह शेजारील आंध्रा, तेलंगणा व कर्नाटक या राज्यातून हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत. दुपारपासून सायंकाळपर्यत हा सोहळा विनाअडथळा पार पडला. परंतु सायंकाळी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर रात्री आठ ते दहा दरम्यान शहरासह कौठा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचा तडाखा कथा मंडपास बसला. सर्व मंडपात पाणीच पाणी झाल्याने हजारो भाविक मंडपात अडकून पडले. चिखल आणि पाणी यामुळे महिला भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. भाविक मंडपात अडकल्याची माहिती मिळताच भाजपचे माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी कौठा येथे धाव घेत भाविकांना मदत दिली. धावाधाव करून चिखलातून वाट काढीत कसरतीअंती मोजके पदाधिकारी, स्वयंसेवक, जिल्हा व पोलिस प्रशासनाने मंडपातील भाविकांना शेजारील मंगल कार्यालय, शाळा व गुरूव्दारा येथे सुरक्षितरित्या हलविसे. सदर काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
चिखलीकर मदतीला धावले!
ढगफुटीसदृश पावसाचा शिवपुराणकथा मंडपाला फटका बसला. त्यामुळे ५० हजारांवर भाविक मंडपातच अडकले. याची माहिती मिळताच माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कथा मंडपास भेट देऊन भाविकांना आश्वस्त केले. त्यानंतर लगतच्या ओम गार्डन, नागार्जूना पब्लिक स्कूल व कौठा येथील गुरुद्वारामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. भाविकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनही सरसावले. तसेच माजी खा. प्रताप पाटील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच दिलीप कंदकुर्ते यांनीही मंडपाला भेट दिली. तेथून भाविकांना हलविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधू, मिर्झा बेग, अग्निशमन दलाचे अधिकारी केरोजी दासरे यांच्यासह त्यांची टीम यंत्रणा कामाला लावली. विविध शाळांच्या बसेस भाविकांना घेऊन जाण्यासाठी सज्ज करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी राऊत
मदतीला धावून आले
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह ६५ जणांच्या टीमने सभा मंडप गाठला. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मदत कार्यालय सुरु केले. भक्तांना खासगी बसेसद्वारे नागार्जूना स्कुल, ओम गार्डन येथे हलविण्यात आले. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसही मदतकार्यासाठी बोलावण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत हे मदतकार्य सुरू होते.