34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeनांदेडनांदेडात २६ एप्रिलला मतदान

नांदेडात २६ एप्रिलला मतदान

नांदेड : विशेष प्रतिनिधी
देशाची १८वी लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून संपूर्ण देशात सात टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दुपारी साडेतीन वाजता प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर तर दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी. तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड तर शेवटचा पाचवा टप्पा २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण ४० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यासाठी ९७ पथके स्थापन करण्यात आली आहे. ९५ भरारी पथके निर्माण करण्यात आली आहे. एकूण ५३ टीम तयार करण्यात आल्या आहेत. तर २७ हजार नवमतदार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ४ हजार जणांविरूद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली.

दि.२८ मार्च रोजी अधिसूचना जाहीर होणार असून ४ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ५ एप्रिल रोजी छाननी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यानंतर ६ जूनला नांदेड लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. लोकसभा निवडणुकीचा हा कार्यक्रम घोषित होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे सर्वांनीच पालन करणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

नांदेड लोकसभेसाठी २६ लाख ७९३ मतदार आहेत. निवडणुकीसाठी २५ हजार डिपॉझीट ठेवण्यात आले असून एका ईव्हीएम मशिनमध्ये १५ उमेदवारांची यादी असेल व एक नोटाचे बटन ठेवण्यात आले आहे. ४८ हजार मयत मतदार वगळण्यात आले असून मतदान करण्यासाठी १६ प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्रा धरण्यात येणार आहेत. ८५ वर्षावरील वयोवृद्धांना मतदानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पाणी, स्वच्छता, पाळणाघर, व्हीलचेअर यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी प्रथमच मतदान केंद्रावर वेटिंग हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे तातडीने लावण्यात आलेले बॅनर हटवावेत, तसेच प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वृत्तांकन करावे सोबतच समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन केले. तर ईव्हीएम मशिनसंदर्भातील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. प्रत्येक राजकीय पक्षासह सामान्य जनतेला ईव्हीएम मध्ये पारदर्शक मतदान होते याची माहिती देण्यात आली. यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, यासह संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नियुक्त केला जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR