37 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeलातूरलातूर लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान

लातूर लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. ४१- लातूर (अ. जा.) लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची अधिसूचना दि. १२ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना दि. १९ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून लातूर लोकसभेसाठी दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असून दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी दि. १६ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली.
भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ कार्यक्रम प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषीत केला आहे. त्यानूसार लातूर लोकसभेच्या निवडणुकीची अधिसूचना दि. १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. दि. १२ ते १९ एप्रिलदरम्यान नामनिर्देन पत्र दाखल करता येणार आहेत. दि. २० एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. दि. २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून दि. ६ जुनपर्यंत निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे., असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी सांगीतले.
४१- लातूर (अ. जा.) लोकसभा मतदार संघात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर (अ. जा.), निलंगा, लोहा आणि धाराशिव लोकसभा मतदार संघातील औश्याच्या काही गावांचा समावेश आहे. लातूर ग्रामीणमधील ३२२९१२, लातूर शहरमधील ३८१३०१, अहमदपूरमधील ३३७९७६, उदगीर (अ. जा.)मधील ३११७५८, निलंगामधील ३२१६९९, लोहामधील २९३५२१ असे एकुण १९ लाख ६९ हजार १७७ मतदारांचा समावेश आहे. यात १०२९९६१ पुरुष, ९३५७७५ स्त्री, ट्रान्स जेन्डर ६३, तर ३३६८ सैनिक मतदारांचा समावेश आहे.
लातूर लोकसभा मतदार संघाची निवडणुक पारदर्शक, शांततेत, कायदा व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ईव्हीएमसह ईतर यंत्रणेचे मॉनिटरींग करण्यात आलेले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी सांगीतले. तर निवडणुकीदरम्यान समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होेईल, असे कृत्य होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. भारत कदम व निवडणुक विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR