लातूर : प्रतिनिधी
राज्यातील कर्मचा-यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देणा-या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथील कुसूमताई वानखेडे, भवन येथे पार पडले. या अधिवेशनाला अध्यक्ष अॅड. कृष्णा इंगळे, उद्घाटक आमदार नितीन राऊत, देविदास घोडेस्वार, डॉ. विभुतीचंद्र गजभिये, प्रा. जावेद पाशा, सुरेश तांबे, प्रभाकर सोनडवले, गणेश मडावी, सुमित भुईगळ, लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, सरचिटणीस अशोक रामलिंग माळगे, नागरत्न कांबळे, ओमकार वंजारे, निलराज बनसोडे आदींची उपस्थिती होती.
आमदार नितीन राऊते, कृष्णा इंगळे, प्रा. जावेद पाशा, देविदास घोडस्वार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेशी राज्यभरातील विविध विभागातील कर्मचारी संघटना जुळलेल्या आहेत. राज्यभरातील जवळपास ३३ संघटनांचा नागपुरातील राज्यस्तरीय अधिवेशनात सहभाग होता. यामध्ये संघटनेचे राज्य कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हास्तरीय पदाधिका-यांचा सहभाग होता. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या ४६ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात मागासवर्गीय कर्मचा-यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी आणि कंत्राटी भरती धोरण बंद करावे, यांसह कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे ठराव सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांनी मांडला. यास सर्व पदाधिका-यांनी अधिवेशनात कर्मचा-यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक सुरक्षिततेशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
















