मुंबई : प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. उमेदवारी न मिळाल्याने मुंबईमध्ये विविध पक्षांमध्ये बंडखोरी होऊन पदाधिकारी राजीनामे देत आहेत. घराणेशाहीबाबत कार्यकर्त्यांमधून आणि पदाधिका-यांमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कुलाबा भागात नार्वेकर कुटुंबातील तिघांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रभाग क्रमांक २२५ मधून हर्षिता नार्वेकर, प्रभाग क्रमांक २२६ मधून मकरंद नार्वेकर आणि प्रभाग क्रमांक २२७ मधून डॉ. गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एरवी काँग्रेस आणि शिवसेनेवर घराणेशाहीचा ठपका ठेवणा-या भाजपाने स्वत:च्या पक्षात एकाच घरातील तीन सदस्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
आमचे सासरे सुरेश नार्वेकर यांच्या लोकसेवेचा वारसा आमचे कुटुंब चालवत आहे, असे हर्षित नार्वेकर यांनी स्पष्ट केले. केवळ आमच्या प्रभागातीलच नाही, तर इतर भागातीलही कोणत्याही प्रश्नासाठी आम्ही नागरिकांच्या हाकेला लगेच धावून जातो, असे हर्षिता यांनी म्हटले आहे.

