24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणूक निकालाची सोशल मीडियावर रंगली चर्चा

निवडणूक निकालाची सोशल मीडियावर रंगली चर्चा

कोल्हापूर : लोकसभा मतदानानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील निकालाचे वारे सोशल मीडियावर जोरात वाहत राहिले. अनेकांनी या निकालातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळणा-या मतांची आकडेमोड शेअर केली आणि त्यावर विविध ग्रुपवर चर्चा रंगली. काही ग्रुपवर तर उमेदवारांच्या छायाचित्रांसह निकालाबाबतच्या मॉर्फ केलेल्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या.

व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांकडून जोरात करण्यात आला. त्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विविध प्रश्न, राजकीय पक्षांची कामगिरी आदी मुद्यांचा समावेश होता.

मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे या प्रचाराचे वातावरण तापले. उमेदवारांबरोबरच त्यांच्या नेतेमंडळींचे मॉर्फ केलेले व्हीडीओ शेअर करण्यात आले. मतदानाची वेळ संपल्यानंतर ‘झाले इलेक्शन जपा रिलेशन’ अशा स्वरूपातील संदेश काहींनी पोस्ट केले. मतदारांचे आभार मानणारे संदेश अनेकांच्या स्टेटसवर झळकले होते.

झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेऊन आकडेमोड करून काहींनी निकालच जाहीर केला. त्यात उमेदवारांची छायाचित्रे, त्यांच्या पक्षाचे चिन्ह, त्यांना मिळालेली मते अशी माहिती असलेल्या मॉर्फ केलेल्या विविध पोस्ट व्हायरल झाल्या.

या निवडणुकीत जिल्ह्यात जी नेतेमंडळी एकमेकांविरोधात मैदानात उतरली, ती सर्व एकत्रित असलेली जुनी छायाचित्रे आज सोशल मीडियावर शेअर झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांच्या राजकीय पक्षांबाबत केलेली वक्तव्ये देखील त्यांच्या छायाचित्रांसह पोस्ट करण्यात आली. त्यावरही तरुणाई, कार्यकर्ते एकमेकांविरोधात चिमटे घेणारे खुमासदार संदेश पोस्ट करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR