धाराशिव : लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उमरग्याच्या इराण्णा कोंगलवार याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली.
त्यावेळेस त्याच्या घरात १२ विद्यार्थ्यांची हॉल तिकिट सापडली. ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकिट आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पोलिस चौकशीला बोलवणार आहेत.
कोणगलवार यांच्या घरातून सहा मोबाईल जप्त करण्यात आले. त्यात पठाणचे तीन मोबाईल, जाधवचे दोन आणि कोणगलवार यांचा एक मोबाईल आहे. कोणगलवार अजूनही फरार आहेत. संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्यासाठी या तिघांचीही बँक पासबुक जप्त करण्यात आली आहेत. आरोपींच्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषा वापरून मेसेज पाठवण्यात आले आहेत. तो डेटा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे.
नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील जिल्हा परिषदेचे पठाण आणि जाधव या शिक्षकांची नावे समोर आली. त्यानंतर अजून चार जण यामध्ये असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी या सहा जणांना आरोपी बनवले. पठाण आणि जाधव यांचे दोन सब एजंट श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरायचे आणि त्यांची माहिती जाधव आणि पठाण यांना द्यायचे.
जाधव आणि पठाण ही बोलणी करण्यासाठी ५० हजार द्यायचे
जाधव आणि पठाण हे विद्यार्थी निश्चित करून उमरगा येथील आयटीमधील इराण्णा कोणगलवार यांच्यासोबत फायनल व्यवहार ५ लाखांत ठरायचा. त्यानंतर या सर्व पैशांची देवाण-घेवाण दिल्लीमधील मुख्य आरोपी गंगाधर याच्यासोबत व्हायची आणि तिथून सर्व प्रक्रिया ऑपरेट व्हायची अशी माहिती पोलिसांना मिळाली. आज पोलिस दिल्लीतील मुख्य आरोपी गंगाधरपर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.