कोलंबो : प्रतिनिधी
टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन करणा-या श्रीलंकेचा प्रवास अखेर संपला. न्यूझीलंडविरुद्ध सुपर ८ मध्ये पराभव झाल्याने श्रीलंकेचे आव्हान संपले आहे. श्रीलंकेचा सुपर ८ मधील हा दुसरा पराभव ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यात श्रीलंकेला अपयश आले. श्रीलंका २० ओव्हरमध्ये ८ बाद १०७ धावा करू शकली. यामुळे न्यूझीलंडने श्रीलंकेला ६७ धावांनी पराभूत केले.
श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय श्रीलंकेला महागात पडला. न्यूझीलंडची ८४ धावांवर ६ विकेट अशी बिकट स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन मिशेल सँटनर आणि कोल मॅककॉन्ची या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे त्यांनी २० ओव्हरमध्ये ७ बाद १६८ धावा केल्या. मिशेल सँटनरने ४७ धावा, कोल मॅककॉन्चीने ३१ धावा केल्या. याशिवाय रचीन रविंद्र याने ३२ आणि फिन एलनने २३ धावा केल्या.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले आव्हान पार करण्यात श्रीलंकेला अपयश आले. श्रीलंकेची टॉप ऑर्डर, मधल्या फळीतील फलंदाज फार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पथुम निसांका खाते देखील उघडू शकला नाही. कुशल मेंडिस ११, चरीथ असलंका ५, पवन रथनायके १०, कमिंदू मेंडिस ३१, दासून शनाका ३ धावांवर बाद झाला. दुनिथ वेल्लालागे यानं श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. रचिन रविंद्र याने श्रीलंकेच्या ४ विकेट घेतल्या.

