लातूर : प्रतिनिधी
नुतन वर्षाचा पंधरवाडा सुरू असलेल्या खुनाच्या सत्राने गाजला असून जिल्ह्यात सुरू असलेल्या खुनाचे सत्र थांबन्याचे नाव घेत नसल्याने जिल्हा वासीय चांगलेच हादरले आहेत. पंधरवाड्यातील झालेला सहा खुनांचा उलगडा व यातील आरोपींना गजाआड करण्यात जरी पोलीसांना यश आले असले तरी ग्रामीण पोलीस ठाण्यात परवा दाखल झालेल्या अज्ञात बालकाच्या सातव्या खुनाचा उलगडा करणे हे आव्हानच आहे.
मागील २०२१ ते २०२३ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात १७ खुन झाले होते. मात्र २०२४ या नूतन वर्षास सुरूवात होताच जिल्ह्यात खुनाच्या सत्रास सुरूवात झाली आहे. नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील लातूर शहर, रेणापूर व औसा तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या. या खुनांचा उलगडा होतो नाही तोवरच दुस-या आठवड्यात जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे दोन चुलत भांवाचा तर उदगीर तालुक्यातील कुमठा येथे एका शाळकरी मुलाच्या खुनाची घटना घडली होती.
या खुनांच्या गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून पोलीस सुटकेचा निश्वास टाकतात नाही तोवरच परवा सायंकाळी लातूर- औसा रोडवर पेठ शिवारात तावरजा नदीवरील पुलाशेजारील पाळूवर अर्धवट अवस्थेत पुरलेल्या ६ ते ७ वर्ष वयाच्या बालकाचा मृतदेह अर्धवट पुरल्याच्या अवस्थेत आढळला. या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या डोक्यास इजा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सपोनि भगवान पुंडलिकराव मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या मयत मुलाची ओळख पटली नाही. व खुन्यांचा ही पोलीसांना अज्ञाप सुगावा न लागल्याने व हा प्रकार नेमका काय आहे, हे अज्ञाप समोर आलेले नाही.